`भाजपच्या सांगण्यावरुन वारिस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव्य `
वारिस पठाण यांनी हे विधान भाजपच्या सांगण्यावरून केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
मुंबई : एमआयएमआयएमचे नेते आणि माजी आमदार वारिस पठाण ( AIMIM leader Waris Pathan) यांनी हे विधान भाजपच्या सांगण्यावरून केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. यांच्यासारख्यांना समाजातूनच हाकलून दिले पाहिजे, असे म्हणत त्यांनी पठाण यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही पठाण यांचे हे विधान अत्यंत चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
१५ कोटी आहेत पण १०० कोटींवर भारी आहेत, असे वादग्रस्त विधान एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी केले. महिलांना पुढे केले जात आहे, असा आरोप होतो. नुसत्या आमच्या सिंहणी बाहेर पडल्या तर तुम्हाला घाम फुटला आहे. आम्ही एकत्र आलो तर काय होईल, याचा विचार करू शकता, असे खळबळजनक विधान वारिस यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
वारिस पठाण ( Waris Pathan) यांनी समाजात तेढ निर्माण होईल असे भाषण केले आहे. १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत. या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले आहे. शिवसेना (Shiv Sena) आणि मनसेने (MNS) तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेने हिंदू-मुस्लीम यांच्यात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे. त्यांना राज्यात बंदी आणण्याची मागणी केली आहे, अशी मागणी मनसे आणि शिवसेनेने केली आहे.