Weather Update: राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा; हवामान खात्याची मोठी माहिती
Maharashtra Weather Update: राज्यात सध्याच्या परिस्थितीत संमिश्र वातावरण दिसून येतेय. यावेळी हवामान खात्याने शुक्रवार पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज दिला आहे.
Maharashtra Weather Update: एकीकडे महाराष्ट्रातील अनेक भागात उन्हाचा चटका वाढला असून नागरिक यामुळे प्रचंड त्रस्त आहेत. अशातच आज गुढीपाढव्याच्या म्हणजेच हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक भागात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय विदर्भातील जवळपास 4 जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
राज्यात या ठिकाणी पावसाचा अंदाज
राज्यात सध्याच्या परिस्थितीत संमिश्र वातावरण दिसून येतेय. यावेळी हवामान खात्याने शुक्रवार पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज दिला आहे. आजच्या दिवशी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशिम, बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ या अकरा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर दुसरीकडे मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी या चार जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे.
याशिवाय 12 एप्रिलपर्यंत मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पासवाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलीये. तर विदर्भात वादळी वारे, वीजांचा कडकडाटासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी, आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30-40 kmph वेगाने येण्याची शक्यता आहे.
हवामानाची स्थिती कशी असेल?
मराठवाडा आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असणार आहे. आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीपासून रायलसीमा ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असणार आहे. दुसरीकडे विदर्भात कमाल तापमान चाळीशीच्या खाली आलं असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमान चाळीशीपार आहे.