सुस्मिता भदाणे, झी२४तास, मुंबई : राज्यात दुष्काळ आहे पण मुंबईत मात्र झाडांना पाणी देतांना पाणी वाया घातलं जातं आहे. झाडांना अशा प्रकारे पाणी दिलं जात आहे की त्या पाण्याचा झाडांना उपयोगच होत नाही आहे. मुंबईमधील महानगरपालिका मार्गावर झाडांना पाणी देण्याचा वेगळाच फंडा पाहायला मिळतो आहे. तीन हजार लीटर पाणी टँकरच्या माध्यमातून झाडांना दिलं जातं. पण त्या पाण्याचा अपव्यय होतो आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिका मार्ग हा साधारण ५० मीटर लांबीचा रोड आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठी झाडं आहेत. साधारण ३० - ४० झाडं असलेल्या या महत्त्वाच्या रस्त्यावर झाडांना दररोज टॅंकरने पाणी दिलं जात. झाडांना पाणी देण्याची ही पद्धत इतकी चुकीची आहे की रस्त्याच्या बाजूला जर तुमची गाडी उभी असेल तर गाडी काही क्षणातच तुम्हाला धुऊन मिळेल आणि झाडं मात्र कोरडीच राहतील.


झाडांच्या भोवती पाणी अडवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं आडोसा नाही. त्यामुळे काही क्षणातच पाणी वाहून जाते. टॅंकरच्या पाण्याचा जोरदार मारा झाडावर होत ‌असल्याने झाडांच्या मुळांजवळची माती निघुन मुळे वर आली आहेत. एकीकडे राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना शहरी भागात झाडांना पाणी देण्याच्या नावाखाली पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे.