मुंबईत बाबासाहेब आंबेडकर स्मारक नेमकं कसं असणार, ते पाहा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतल्या दादर इथल्या इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणारं आंतरराष्ट्रीय किर्तीचे स्मारक नेमकं कसं असेल ?
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतल्या दादर इथल्या इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणारं आंतरराष्ट्रीय किर्तीचे स्मारक नेमकं कसं असेल याबाबत प्रसिद्ध वास्तुविशारद शशी प्रभू यांनी माहिती दिली आहे. मुंबईतल्या दादरमधील इंदू मिलमध्ये उभारण्यात येणार-या बाबासाहेबांच्या स्मारकाची दृश्य स्वरुपात इमारत २०१९ पर्यंत उभी राहणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी केलाय. तसंच १४ एप्रिल २०२० पर्यंत बाबासाहेबांचे स्मारक पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली स्मारकासंदर्भातल्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत..स्मारकाचं काम सुरू झालं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती 36 मजली उंचीच्या इमारती एवढी असेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. उद्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं मुख्यमंत्र्यांनी इंदू मिलची पाहणी केली.
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती. १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी डॉ. आंबेडकरांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं. समाजातील जातीभेदाचे उच्चाटन करुन त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित केला.
तळागाळातील लोकांना बौद्धिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन समानतेचा मंत्र देणारे दीपस्तंभ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. गरीबी, निरक्षरता ही गुलामगिरीची मूळ कारणं असल्यानं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र त्यांनी दिला. देशाची घटना लिहून त्यांनी प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळवून दिला. पाच हजार वर्षांपासून अमानुष, लाचारीचे जीवन जगणा-या जनमानसात आत्मसन्मानाची आणि अस्मितेची ज्योत पेटवणा-या महामानवाला झी २४ तासचाही सलाम.