मुंबई : महाराष्ट्र राज्यात कोणाचे सरकार येणार अशी उत्सुकता असताना आज सकाळी मोठी राजकीय घडामोड झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत सरकार स्थापन करण्यास हातभार लावला. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत ८ ते १० आमदार होते.  मात्र, त्यातील काही आमदारांनी अजित पवारांची पोलखोल केली आहे. आम्हाला अजित पवारांचा फोन आला. त्यांनी काहीही सांगितले नाही. त्यांनी केवळ बैठक आहे. त्यामुळे तुम्ही या. त्यानंतर आम्ही गेलो. मात्र, तेथील जी काही परिस्थिती दिसून आल्यानंतर आम्हालाही धक्का बसला. भाजपचे नेते मंडळी होती. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस तेथे आल्याने आमच्या लक्षात काय ते आले. त्यानंतर आम्ही पक्षनेतृत्वाला सांगितले.  आम्हाला यातील काहीही सांगितले नाही, अशी भूमिका पत्रकार परिषदेत मांडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांची पोलखोल राजेंद्र शिंगणे यांनी केली. रात्री १२ वाजता फोन आला. सकाळी ७.०० वाजता धनंजय मुंडेंच्या घरी बोलावलं गेले. तिथं ८-१० आमदार होते. एका बैठकीसाठी जायचंय असं सांगितलं गेले आम्हाला. राजभवनावर जाईपर्यंत पुसटशी कल्पनाही नव्हती. तिथं भाजपचे लोक होते. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनावर शपथविधी झाला, अशी माहिती राजेंद्र शिंगणे, संदीप क्षिरसागर, सुनील भुसारे यांनी दिली. आपण शरद पवारांसोबत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. संदीप शिरसागर, सुनील भुसारे यांच्यासह पाच आमदार हे शरद पवारांसोबत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी शिंगणे आणि भुसारे यांनी आम्हाला फसवणूक करुन नेल्याचे म्हटले आहे. आम्ही पक्षासोबत आहोत, असे त्यांनी जाहीर सांगितले.


राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होण्याची शक्यता असताना भाजपने राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेचा दावा केला. अजित पवारांनी भाजपसोबत जात सगळ्यांनाच अंचबित केले. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना दिले. मात्र, राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटलेला नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. अजित पवार यांनी दिलेले पत्र हे पाठिंब्याच्या सह्यांचे नव्हते. त्यांनी राज्यपाल यांचीही फसवणूक केली आहे. 


राज्यात जनमत जे आहे. ते भाजपच्या विरोधात आहे, असे असताना त्यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयाला जनता पूर्ण विरोध आहे, जर पुन्हा निवडणूक झाली तर त्यांचा पराभव हा निश्चित केला जाईल, शरद पवार यांनी म्हटले आहे. ८ ते १०  आमदार त्यांच्यासोबत गेल्याचे समजते आहे. जे अपात्र होतील त्यांच्याविरोधात आम्ही तीन पक्ष काय करायचे ते करु, असेही पवार यांनी सांगितले. आता आम्ही पक्षाची बैठक घेत आहोत. त्याबैठकीत आम्ही काय  तो निर्णय घेऊ, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. 


दरम्यान, देशात पक्षांतर बंदीचा कायदा करण्यात आला आहे, हे अनेकांना माहीत नसावे. त्यामुळे नंतर जी कारवाई होईल त्यासाठी आम्ही योग्य ती कारवाई करु. भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही. आमच्याकडे १६९ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे ३० तारखेनंतर आम्ही सरकार स्थापन करु, असेही पवार यांनी म्हटले  आहे. आम्ही एकत्र होतो, आहोत आणि राहू असंही शरद पवार यांनी स्पष्ट केले.