मुंबई : देशात कोरोनाचा धोका वाढत आहे. तरी देखील मुंबई आणि परिसरात लोक विनाकारण फिरताना आणि वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करतांना दिसत आहेत. हे अजिबात अपेक्षित नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कोरोनाची साथ जी आपण आटोक्यात ठेवली आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढून आपल्यासमोर आव्हान उभे राहील. पावसाळा, कोरोना तसेच मुंबईसंदर्भातील इतर नागरी समस्यांवर आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आपण अनलॉकमधील नियमांनुसार कार्यालयांमध्ये जात असाल, दवाखाने किंवा इतर आवश्यक कारणांसाठी जाणे गरजेचे असेल तर तुम्हाला कुणी अडवणार नाही, पण कोणतेही कारण नसताना फिरायला गेल्यासारखे बाहेर पडत असाल, वाहनांची गर्दी होणार असेल  तर तुम्ही स्वत:चा आणि इतरांचाही धोका वाढवीत आहात हे लक्षात ठेवा.' त्यामुळे नागरिक म्हणून जबाबदारीने वागणे पण गरजेचे आहे असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. 


साफसफाईत समन्वय ठेवा
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देखील उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीए यांनी समन्वयाने या पावसाळ्यात कुठेही पाणी साचून नागरिकांचे हाल होणार नाहीत. त्यामुळे नाले स्वच्छता, साफसफाई करतांना लोकप्रतिनिधी तसेच इतर सर्वांच्या संपर्कात राहून तातडीने कामे पूर्ण करावीत असे निर्देशही  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.


पावसाळ्यामध्ये मेट्रोच्या कामांमुळे तयार झालेल्या खड्ड्यांत पाणी साचण्याचा आणि पर्यायाने दुर्घटना घडणे, रोगराई वाढण्याचा संभव असल्याने सर्व प्राधिकरणानी एकत्र येऊन ही कामे पूर्ण करावीत असेही ते म्हणाले. 


जे परराज्यातील मजूर परत राज्यांत परतता आहेत त्यांची कोविड चाचणी व्हायला पाहिजे, मेट्रो मार्गावर कामांसाठी जे कमी तीव्रतेचे स्फोट केले जात आहेत त्यामुळे काही ठिकाणी आजूबाजूच्या इमारतींना तडे गेले आहेत.मुंबई पालिकेने व एमएमआरडीएने मिळून या इमारतींच्या बांधकामांचे बांधकाम ऑडीट करावे,स्थानिकांना कामांमध्ये प्राधान्य द्यावे अशा मुद्य्यांवर देखील बैठकीत चर्चा झाली.