मुंबई : एमआयडीसीच्या जमीन खरेदीवरुन वादात सापडलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना भापकडून सातत्याने डावले जात आहे. त्यामुळे ते तीव्र नाराज आहे. अनेक वेळा खडसे यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केलेय. दरम्यान, भाजपमध्ये नाराज असलेले खडसे जर काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.


काँग्रेसची ऑफर!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खडसे यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर त्यांना भाजपकडून सातत्याने डावले जातेय. तसे खडसे यांनी बोलूनही दाखवले आहे. त्यांची ही नाराजी हेरत काँग्रेसने आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच ते काँग्रेसमध्ये येणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू असे चव्हाण यांनी म्हटलंय.


खडसे यांनी हिवाळी अधिवेशनात आपल्याच सरकारला विधानसभेत घेरले. त्यावेळी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनीही खडसेंना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. मात्र भाजपशी मी निष्ठावान आहे, ४० वर्षे या पक्षासाठी काम केले आहे. असे उत्तर खडसे यांनी त्यावेळी यशोमती ठाकूर यांना दिले होते. आता पुन्हा अशोक चव्हाण यांनी स्वागत करण्याची भाषा केल्याने राजकीय चर्चा रंगली आहे.


 मंत्रिमंडळातून पायउतार 


दरम्यान, पुणेमधील भोसरी एमआयडीसीच्या जमीन खरेदी व्यवहार करताना खडसे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. त्यामुळे ते मंत्रिमंडळातून त्यांना पायउतार व्हावे लागले. ते नाराज आहेत, त्यांची घुसमट होते आहे हे त्यांनी आपल्या वक्तव्यांमधून वारंवार सांगितलेय. अशात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीच काँग्रेसमध्ये खडसे आले तर त्यांचे स्वागत करू म्हणत त्यांना ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


राष्ट्रवादीशीही  जवळीक


दरम्यान, जळगावमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ खडसे एकाच मंचावर होते. त्यांची जवळीक ही राज्यात चर्चेचा विषय होती. ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. मात्र, अशोक चव्हाण यांच्या स्वागत करण्याच्या विधानाने राजकीय चर्चा रंगली आहे.