मुंबई : संजयलीला भन्साळींच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ या सिनेमाला महाराष्ट्रात संरक्षण देऊ, अशी भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. 


‘थिएटरला संरक्षण देऊ’


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे, त्यामुळे हा सिनेमा महाराष्ट्रात जिथे प्रदर्शित होईल त्या थिएटरला संरक्षण देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. 


करणी सेनेचा विरोध कायम


राजपूत संघटनांचा या सिनेमाला विरोध कायम आहे. चित्रपटावर बंदी न घातल्यास प्रजासत्ताक दिनावर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा राजपूत करणी सेनेनं दिलाय. तसंच चित्रपट प्रदर्शित होतोय, त्या 25 जानेवारीला भारत बंदची हाकही करणी सेनेने दिलीये. गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल का, याबाबत साशंकता आहे, गुजरातमध्ये फक्त सिंगल स्क्रिनवर हा सिनेमा झळकणार आहे.


राजस्थान आणि मध्यप्रदेश सरकार पुन्हा कोर्टात


दोन्ही राज्याच्या सरकारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. सर्वोच्च न्यायालायनं १८ तारखेला ‘पद्मावत’च्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दिला. शिवाय कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी संपूर्णपणे राज्य सरकारची असल्याचंही कोर्टानं म्हटलं होतं. राज्य सरकारांनी सिनेमॅटोग्राफ्री कायद्याचा हवाला देऊन प्रदर्शनाला विरोध केलाय. निर्मात्यांचे वकील हरिश साळवे यांनी उद्या कोर्टात उत्तर देण्यास तयार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे याप्रकरणी सरन्यायाधीशी दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए एम खानविलकर, आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड उद्या सुनावणी करणार आहेत.