मुंबई : एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाची जबाबादारी स्वीकारताच अॅक्शन मोडमध्ये आले. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी मेट्रो 3 चं  कारशेड हे आरेतच होणार असल्याचं सांगितलं. या निर्णयावरुन माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. माझ्यावरील राग माझ्या मुंबईवर काढु नका. मुंबईच्या काळजात कट्यार घुसली अस करु नका, असं आवाहन उद्धव यांनी पत्रकार परिषदेत केलं.  आता या आवाहनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (we will think about uddhav thackeray role about aarey metro 3 car shed says deputy chief minister devendra fadnavis)


फडणवीस काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"उद्धव ठाकरे यांच्या मेट्रो 3 कारशेडबाबत असलेल्या भूमिकेबाबत विचार करु", अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्र्यांनी दिली.


कारशेड, स्थगिती आणि पुन्हा....


राज्यात 2014 मध्ये महायुती सरकार होतं. तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रो कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा या कारशेडसाठी हजारो झाडं जमीनदोस्त करण्यात आली होती. 


या निर्णयाविरोधात हजारो पर्यावरणवाद्यांनी या निर्णयाचा विरोध केला. तत्तकालीन राज्य सरकारविरोधात अनेक आंदोलनं करण्यात आली. अनेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. आरे हे मुंबईचं फुप्फुस आहे, तिथे कारशेड नकोच, अशी आग्रही आणि तितकीच आक्रमक भूमिका ही पर्यावरणवाद्यांनी घेतली. 


यानंतर राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सराकर आलं. तेव्हा मुख्यमंत्री पदावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी आरेमधील कारशेडला स्थगिती दिली. तसेच हे कारशेड कांजुरमार्ग इथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. 


मात्र आता एकनाथ शिंदे यांनी आरेतच कारशेड करायचं, असं म्हटलं. त्यानुसार महाधिवक्त्यांना न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडण्याचे आदेशही देण्यात आले. 


मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी (1 जुलै) पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी कारशेड आरेमध्ये करण्याच्या निर्णयावरुन नाराजीच व्यक्त केली. त्यानंतर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे आता राज्य सरकार नक्की काय भूमिका घेतं, याकडे पर्यावरणवादी संघटनांचं लक्ष असणार आहे.