मुंबई: लॉकडाऊनमुळे राज्यात अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी लवकरच मार्ग शोधू, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांना पुन्हा आशेचा किरण दिसू लागला आहे. यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, सर्व लोकांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी आमची बोलणी सुरु आहेत. सर्व राज्यांकडून एकमेकांच्या नागरिकांचे आदानप्रदान केले जाईल. आम्ही लवकरच यावर काहीतरी मार्ग शोधून काढू. मात्र, राज्यात ट्रेन पुन्हा सुरु होणार नाही. कारण, आम्हाला पुन्हा गर्दी जमून द्यायची नाही. मात्र, संधी मिळताच सर्व कामगारांना आपापल्या गावी पाठवण्यात येईल. सरकारकडून तशा सूचना दिल्या जातील. मात्र, या सगळ्यात कोणतीही घाई होता कामा नये. हळूहळू सर्व गोष्टी मार्गी लागतील. अन्यथा आतापर्यंतची लॉकडाऊनची मेहनत फुकट जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, देशाच्या विविध भागांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी पाठवण्यासाठी विशेष एक्स्प्रेस गाड्यांची सोय करण्यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये अनौपचारिक स्तरावर सध्या चर्चा सुरु आहे. यासंदर्भात काही रेल्वे अधिकाऱ्यांकडून “Facilitating Migrants Travel” या मथळ्याखील एक प्रबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रबंधांमध्ये स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी पोहोचवण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. 'द इंडियन एक्स्प्रेस'ने यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध केली आहे.

त्यानुसार प्रत्येक राज्याने स्क्रीनिंग केलेल्या लोकांना बसद्वारे रेल्वे स्थानकांपर्यंत आणून सोडावे. यानंतर या लोकांना विशेष रेल्वेगाड्यांतून आपापल्या राज्यात पाठवण्यात येईल. सर्व मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी काही दिवस न थांबता या रेल्वेच्या फेऱ्या सुरु ठेवाव्या लागतील. या विशेष रेल्वेगाड्या कुठेही न थांबता थेट संबंधित राज्यांमध्ये जातील. यासाठी राज्यांनी रेल्वे विभागाला कन्टेन्मेंट झोन आणि हॉटस्पॉटची माहिती पुरवावी. त्यानुसार राज्यांनी सांगितलेल्या स्थानकांवर या प्रवाशांना उतरवण्यात येईल. 

तसेच स्थलांतरित मजुरांनी आपले रोजगार गमावल्याने त्यांच्याकडून रेल्वे प्रवासाचे शुल्क आकारण्यात येऊ नये. सरकारने याची भरपाई रेल्वेला द्यावी. रेल्वे प्रवासादरम्यान कोणत्याही प्रवाशाने चेन ओढून गाडी थांबवू नये, यासाठी चेनवर ड्राय पेंट करण्यात येईल. जेणेकरून कोणत्याही प्रवाशाने तसा खोडसाळपणा केल्यास त्याला तात्काळ पकडता येईल, अशी सविस्तर योजना रेल्वेच्या प्रबंधात मांडण्यात आली आहे. 

काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारने आपापल्या राज्यातील मजुरांना परत आणण्याची घोषणा केली होती. लॉकडाऊन संपल्यानंतर अनेक शहरांमध्ये दैनंदिन व्यवहारांना पुन्हा सुरुवात होईल. अशावेळी स्थलांतरित मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी होऊ शकते. त्यामुळे लॉकडाऊन संपण्यापूर्वीच या मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात यावे, असे हर्ष श्रीवास्तव यांनी प्रबंधात म्हटले आहे. हर्ष श्रीवास्तव हे २०१४च्या बॅचचे वाहतूक अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या सहकारी सृष्टी गुप्ता आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रबंध तयार केला आहे.