मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांत पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. सलग पाऊस कोसळत नाही. मात्र पुढच्या 4 दिवसात राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील 4 दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पाच दिवसांत या भागात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल असा इशारा कुलाबा वेधशाळेनं दिला. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना वेधशाळेकडून देण्यात आल्यात.


अमरावतीच्या मेळघाटात रात्रभर पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामळे अनेक नदी नाल्या दुधडी भरून वाहतायेत. तर दिया येथील सिपणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं दिया गावातील एक आदिवासी युवक पूल ओलांडत असताना वाहून गेला. 


नदीच्या पुलावरून 10 फूट उंच पाण्याचा प्रवाह सुरू आहे. त्यामुळे नदीच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान नदीकाठील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. गेल्या 24 तासात पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली. आज पाणी पातळी 32 फूट 9 इंचावर जावून पोहचली आहे. 


पंचगंगा नदीची इशारा पातळी ही 39 फूट असून धोका पातळी ही 43 फूट इतकी आहे.जिल्ह्यातील पश्चिम भागातील शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी या तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तर आजरा, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. 


जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून अनेक नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत. पंचगंगा नदी देखील पुन्हा एकदा पात्राबाहेर पडली असून या नदीवरील 34 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.