भावना लोखंडे, मुंबई : मुंबईत यावर्षी शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. एक शिंदे गटाचा आणि दुसरा ठाकरे गटाचा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. शिंदेंनी त्यांच्या मेळाव्यात ठाकरे कुटुंबातील काही सदस्य बोलावले. यात एक होते उद्धव ठाकरे यांचे मोठे भाऊ जयदेव ठाकरे. तसेच त्यांच्या घटस्फोटीत पत्नी स्मिता ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि मोठा मुलगा बिंदुमाधव यांचा मुलगा निहार ठाकरे. त्याचबरोबर बाळासाहेबांसोबत नेहमी राहणारे चंपा सिंह थापा हे ही मेळाव्यात उपस्थित होते. (Uddhav Thackeray and jaidev thackeray)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबातील अंतर्गत कलह पुन्हा चर्चेत आले. कारण कौटुंबिक वादामुळे उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे दुर झाले. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील सदस्यांना मेळाव्याला आमंत्रित करुन ठाकरे कुटुंब आपल्या पाठिशी असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.


शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात जयदेव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यांना एकटं पडू देऊ नका असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. यादरम्यान स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी मेळाव्यास आमंत्रित केल्याचं सांगितलं.


शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तीन मुलं आहेत. बाळासाहेबांचा सर्वात मोठ्या मुलाचं नाव आहे बिंदुमाधव ठाकरे. त्यांचं 1996 मध्ये एका कार अपघातात निधन झालं. दुसरे आहेत जयदेव ठाकरे आणि तिसरे सुपुत्र उद्धव ठाकरे.


जयदेव ठाकरे यांचे कुटुंबीयांशी चांगले संबंध नाहीत. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेवरून न्यायालयात दीर्घ लढा दिला. मात्र नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांनी खटल्यातून माघार घेतली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या मालमत्तेत फेरबदल केल्याचा दावा जयदेव यांनी केला होता.


जयदेव यांनी मालमत्तेच्या वादावरून मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. बाळासाहेबांनी त्यांच्या मालमत्तेवर डिसेंबर 2011 मध्येच स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यानंतर 17 नोव्हेंबर 2012 मध्ये त्यांचं निधन झालं. ज्यावेळी बाळासाहेबांनी मालमत्तेच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या तेव्हा त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती आणि त्याचाच फायदा उद्धव ठाकरेंनी घेतला, असा दावा जयदेव यांनी केला.


बाळासाहेबांनी संपत्तीचा मोठा वाटा उद्धव ठाकरेंच्या नावावर केला. बाळासाहेबांनी मागे ठेवलेल्या संपत्तीची किंमत 14.85 कोटी रुपये असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला. मात्र जयदेव यांनी मातोश्री बंगलाच 40 कोटीं रुपयांचा असल्याचं सांगितलं. आणि संपूर्ण मालमत्ता 100 कोटींहून जास्त असल्याची सांगितलं. बाळासाहेबांनी मातोश्री बंगला उद्धव ठाकरेंच्या नावावर केला. तर बंगल्याचा पहिला मजला जयदेव यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरेच्या नावावर केला. मात्र जयदेव ठाकरे ऐश्वर्यला आपला मुलगा मानण्यास नकार देतात.


भांडणाची सुरूवात -  


जयदेव यांना राजकारणात फारसा काही रस नव्हता. मात्र त्यांची पत्नी स्मिता ठाकरे यांना राजकारणात सक्रिय व्हायचं होतं. पण त्यांचं राजकारणात येणं बाळासाहेबांना नापसंत होते. बाळासाहेबांची पत्नी मीनाताई यांचं हृदय विकारामुळे 6 सप्टेंबर 1995 ला निधन झालं. त्यांच्या निधनानंतर स्मिता यांनी हळूहळू राजकारणात सक्रिय व्हायला सुरूवात केली. जयदेव यांनी 1999 मध्ये मातोश्री सोडलं. मात्र त्यांची पत्नी 2004 पर्यंत तिथेच राहत होत्या. दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी मातोश्री सोडलं. उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात जो वारसा हक्क दाखल केला होता, त्यात केलेल्या उल्लेखाप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होत की, 'जयदेव यांनी बंडखोर व्यक्तिप्रमाणे आयुष्य व्यतीत केलं. ते खूप वर्षांपूर्वीच मातोश्री सोडून निघून गेले होते'.


उद्धव ठाकरेंनी जयदेव ठाकरे यांचं रेशन कार्डावरील नाव हटवण्याचा डाव रचला. तरीही उद्धव यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कधीही माझा फोन सुद्धा घेतला नसल्याचं जयदेव यांनी सांगितलं. जयदेव यांनी कोर्टात सांगितलं की, 1970 मध्ये त्यांचे बाळासाहेबांशी चांगले संबंध होते. त्यांची सगळी कामं ते बघायचे. त्यानंतर जयदेव यांनी राजकारणात सक्रिय व्हावं अशी बाळासाहेबांची इच्छा होती. मात्र जयदेव यांना राजकारणात येण्यास फारसा रस नव्हता. त्यावेळी राज ठाकरे राजकारणात सक्रिय होते आणि त्यांची शैली हुबेहुब बाळासाहेबांसारखी होती. त्यामुळे सर्वजण राज ठाकरेंनाच बाळासाहेबांचा उत्तराधिकारी मानत होते. त्यानंतर 90 च्या दशकात उद्धव ठाकरे ही राजकारणात सक्रिय झाले.


जयदेव यांच्या म्हणण्यानुसार, बिंदुमाधव यांनाही राजकारणात रस नव्हता. त्यांना बिझनेस आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची इच्छा होती. मात्र 1996 मध्ये एका कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी माधवी मुलगी नेहा आणि मुलगा निहारसह मातोश्री सोडून निघून गेले.