पालिका अधिकारी, पोलिसांच्या डोळ्यांत का खुपतायत शेतकरी?
राज्य कृषि-पणन मंडळाची परवानगी असतानाही वारंवार केल्या जाणाऱ्या तक्रारींमुळे शेतकरी हवालदिल झालाय.
गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : मुंबईत शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना महापालिका आणि पोलीस यंत्रणा कशी त्रास देते, त्याबाबतचा हा खास रिपोर्ट... शुक्रवारी एका शेतकऱ्याने मंत्रालयासमोर भाजीपाला आणून टाकला आहे. उस्मानाबादचा हा शेतकरी पिकवलेला भाजीपाला मुंबईत आठवडी बाजारात आणतो. मात्र मागील काही दिवसांपासून मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप शेतकरी उमेश शिंदे यांनी केला आहे. आपण विकायला आणलेला माल अधिकारी आणि पोलीस फेकून देतात. नाहक दंड करतात असा आरोप त्यांनी केला आहे. स्थानिक व्यापाऱ्यांना झुकते माप देण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास देण्यात येतो, असा आरोप शेतकरी उमेश शिंदे यांनी केला आहे.
शेतकऱ्यांना कोण अडवतंय?
शेतात दिवस रात्र काबाड कष्ट करून पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी पुरता हैराण झालाय. त्यातच व्यापारी आणि दलालांकडून होणाऱ्या पिळवणुकीमुळे हाती काहीच लागत नाही. त्यामुळे योग्य हमीभाव मिळावा म्हणून बळीराजा आता शेतीमाल घेऊन थेट मुंबई गाठू लागलाय. शेतकऱ्यांनी मुंबईतील कांदीवली, गोरेगाव, दहिसर-बोरिवली, दादर-लालबाग भागात आपला माल विकण्यासाठी स्टॉल थाटलेत.
ग्राहकानांही भाव परवडत असल्याने मोठ्या संख्येने ते हा माल खरेदी करण्यासाठी येतात. मात्र, येथेही बळीराजाला सहजासहजी कसं मिळणार? बळीराजाकडून महापालिका आणि स्थानिक नेत्यांना कोणताच फायदा होत नसल्याने त्यांना या भागातून हद्दपार करण्याचा कुरापती सुरू केल्यात. राज्य कृषि-पणन मंडळाची परवानगी असतानाही वारंवार केल्या जाणाऱ्या तक्रारींमुळे शेतकरी हवालदिल झालाय.
महापालिका प्रशासनाला याबाबत विचारलं असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. दुसरीकडे आठवडी बाजारात फेरीवल्यांना बसू दिलं जात असल्याने शेतकऱ्यांचा असंतोष पाहायला मिळतोय.