मुंबई : भले बुरे ते विसरून गेले. विसरून जाऊ सारे क्षणभर, म्हणत शिवसेना-भाजपने पुन्हा संसार थाटला आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून सत्तेत एकत्र असूनही विरोधकांप्रमाणे भांडणाऱ्या भाजप शिवसेनेनं अखेर सोमवारी आगामी निवडणुकीसाठी युतीची अधिकृत घोषणा केली. शिवसेना लोकसभेच्या २३ तर भाजप २५ जागा लढवणार आहे. विधानसभेत मित्र पक्षांना जागा सोडल्यानंतर उरलेल्या जागा भाजप-शिवसेना समसमान लढवणार आहे. पण मुका घेतला तरी युती करणार नाही, टाळी मागितली तरी देणार नाही. असं छातीठोकपणे सांगणारे शिवसेना नेते आता काय वक्तव्य करणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपा-शिवसेनेनं आगामी निवडणुकीसाठी युतीची अधिकृत घोषणा केली. मात्र या विषयावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर आजच्या सामन्यात अग्रलेख आहे. दंगली व दहशतवादी हल्ले हे निवडणुका जिंकण्याचे साधन ठरू नये. तसे कोणी करीत असेल तर ईश्वर त्या सर्वच राजकीय पक्षांना सुबुद्धी देवो..अशा शब्दांत आजच्या अग्रलेखातून कोणाचंही नाव न घेता टीका करण्यात आली आहे.


भाजपनं विश्वासघात केला, गुजरात निवडणूक हा ट्रेलर आहे, ५६ इंचाची छाती लागते. गेल्या पाच वर्षांत स्वबळाच्या खुमखुमीतून आलेले संजय राऊत यांचे हे बोचरे बाण. मुका घेतला तरी युती नाही असं राऊत म्हणत असताना राऊतांना दाराबाहेर ठेवून युती झाली. युती झाल्यानंतर आता संजय राऊत सामनातून यापुढे काय बोलणार, काय लिहिणार याची उत्सुकता आहे.


पहले मंदिर फिर सरकार?


पहले मंदिर फिर सरकारचा नारा आता ३६० अंशांच्या कोनात फिरलाय आणि आधी सरकार मग जमलं तर मंदिर असा झाला आहे. एका रात्रीत भाजपशी घरोबा केल्यानंतर पहिल्या दिवसापासून शिवसेनेची भाजपवर टीका सुरु होती. गुजरात निवडणुकीच्या निकालापासून तर सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे की विरोधकांचं असा प्रश्न अनेकांना पडला होता. याच दरम्यान संजय राऊत हे शरद पवारांचे प्यादे असल्याचा आरोपही झाला.


विरोधकांची युतीवर टीका?


भाजपने ईडीची भीती घालून शिवसेनेला युती करण्यास भाग पाडल्याचा खळबळजनक आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. तर ही राफेल चोर आणि सत्तेसाठी लाचारांची युती असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंही या युतीवर टीका केली आहे. कालपर्यंत चौकीदार चोर आहे असे म्हणणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आता युती केली.