संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय घेणार निर्णय?
पूजा चव्हाण प्रकरणात (Pooja Chavan Case) वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात (Pooja Chavan Case) वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. दरम्यान, या राजीनाम्यानंतर चर्चा सुरु झाली आहे की, मुख्यमंत्री ठाकरे आता काय निर्णय घेणार याची. दरम्यान, पोलीस चौकशीनंतरच राजीनामा स्वीकारण्याची विनंती संजय राठोड यांनी केली आहे. (Sanjay Rathod Resigns after meeting CM Uddhav Thackeray)
चर्चगेटमधील छेडा सदन निवासस्थानाहून दुपारी संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकारी निवासस्थान वर्षा बंगल्यावर गेले. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावेळी वर्षा निवासस्थानी मंत्री एकनाथ शिंदे हेही होते. दरम्यान, संजय राठोड यांच्यामुळे आघाडी सरकारवर मोठा दबाब वाढला होता. संजय राठोड यांचा त्वरीत राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने केली होती. तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना फटकारले होते. 'मी निर्णय घेण्याआधी तू निर्णय घे', असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात फटकारले होते. त्यामुळे संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागणार, अशीच चर्चा होती. आज दुपारी दुपारी अडीचच्या सुमारास संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले. त्यानंतर राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या चौकशीनंतरच राजीनामा स्वीकारण्याची विनंती राठोड यांनी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र दालनात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलीस चौकशीनंतर राजीनामा मंजूर करावा, अशी विनंती संजय राठोड यांनी केली. यावेळी मला माझा निर्णय घ्यावा लागेल, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती, अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री ठाकरे हे राठोड यांचा राजीनामा स्विकारणार का की चौकशी पूर्ण झाल्यानंतर मंजूर करण्यार याची चर्चा सुरु झाली आहे.
बीड येथील पूजा चव्हाण हिने पुणे येथे आत्महत्या केली होती. त्यानंतर पूजा चव्हाण प्रकरणी वेगवेगळी माहिती पुढे आली. यात आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे आले आणि पूजा चव्हाण प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले होते. नाव पुढे आल्यानंतर संजय राठोड अडचणीत आले होते. विरोधकांकडून सातत्याने संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. पूजा चव्हाण प्रकरणानंतर संजय राठोड यांच्यावर आरोप झाले. पूजा चव्हाणसोबतचे फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सरकारला या प्रकरणावरून कोडींत पकडले होते.