लक्षात ठेवा, चुकून रेल्वेत महिलांच्या डब्यात चढलात तरी...
कुठल्याही क्लासपेक्षा आणि महिला-पुरुष डब्यापेक्षा कुणाचंही आयुष्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे कृपया लक्षात ठेवा...
गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : प्रवाशांनो, कृपया इकडे लक्ष द्या.... फलाट आणि पायदान यातल्या अंतरावर लक्ष ठेवा... अशा सूचना मुंबईकरांना तोंडपाठ आहेत... पण मुंबईत नवख्या असलेल्या लोकल प्रवाशांना धावपळीत हा अंदाज येत नाही... त्यात लेडीज डब्यात चढल्यानं माणूस आणखीच गांगरून जातो... त्याचे किती गंभीर परिणाम होतात, हे नुकत्याच घडलेल्या घटनेवून लक्षात येतं. मुंबईची ही लाईफलाईन बऱ्याच वेळा जीवघेणी ठरते... मुंबईत नवखा माणूस या लोकलच्या धावपळीत अगदीच गांगरुन जातो... आणि त्यामुळेच हीच लोकल बऱ्याच वेळा त्याच्यासाठी जीवघेणी ठरते... असंच घडलं अविनाश दुग्गल यांच्याबाबतीत...
अविनाश दुग्गल हे व्यवसायानं कोरिओग्राफर... अर्थात नृत्यदिग्दर्शक... वय वर्ष २८... थ्री डी डान्स नावाचा त्यांचा एक ग्रुप आहे. अविनाश दुग्गल त्यांच्या विद्यार्थ्यांसह मुंबईतल्या हिपपॉप नृत्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी आले होते. नृत्यस्पर्धेचा सराव संपल्यानंतर दुग्गल आणि त्यांच्या ग्रुपनं मालाडमधून बोरीवली लोकल पकडली.... त्यावेळी ते चुकून महिलांच्या डब्यात चढले.... महिलांच्या डब्यात चढल्याचं लक्षात येताच त्यांनी चालत्या ट्रेनमधून उडी मारली.... त्यात त्यांचा पाय निसटला आणि ते प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या गॅपमध्ये पडले... सध्या ते मृत्यूशी झुंज देतायत...
मुंबईत नवख्या माणसाला महिलांचा डबा, फर्स्टक्लास डबा, सेकंडक्लास डबा यातला फरक लगेच कळत नाही.... महिला डब्यात चुकून एखादा पुरुष चढला तर ब-याचवेळा महिला आरडाओरडा करुन त्या माणसाला उतरायला भाग पाडतात.
महिलांच्या डब्यात एखादा पुरुष चढलाच तर आरडाओरडा करुन त्याला ताबडतोब उतरवण्याची गरज नाही. तो पुढच्या स्टेशनला उतरू शकतो...
महिलांच्या डब्यात चुकून एखादा पुरूष चढला तरी त्यालाही अपराधी वाटण्याची गरज नाही, पुढच्या स्टेशनला तुम्ही उतरु शकता
एखादी व्यक्ती चुकून फर्स्टक्लासमध्ये चढली तर तिलाही ताबडतोब उतरवण्याची जबरदस्ती करु नका
कुठल्याही क्लासपेक्षा आणि महिला-पुरुष डब्यापेक्षा कुणाचंही आयुष्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे कृपया लक्षात ठेवा...