पोलिसांनी अटक केलेल्या इक्बाल कासकरची पार्श्वभूमी
अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई साखळी बॉम्ब स्फोटांचा आरोपी दाऊद इब्राहिम याचा सर्वात लहान भाऊ इक्बाल कासकरला खंडणीप्रकरणात अटक झालीय.
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई साखळी बॉम्ब स्फोटांचा आरोपी दाऊद इब्राहिम याचा सर्वात लहान भाऊ इक्बाल कासकरला खंडणीप्रकरणात अटक झालीय. त्यामुळे मुंबईत परिसरात अंडरवर्ल्डचा खात्मा झाल्याचा पोलिसांचा दावा फोल ठरलाय. मात्र यानिमित्तानं मुंबईत नवा भाई जन्माला येतोय की काय याची चर्चा सुरू झालीय.
ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी ठाणे पोलीसांच्या खंडणी विरोधी पथकाने इक्बाल कासकरला मुंबईतल्या नागपाड्यातून अटक केलीय. इक्बाल कासकर हा २००३ पर्यंत दुबईत वास्तव्याला होता. १९ मार्च २००३ ला इक्बालला मुंबई विमानतळावर मोक्का खाली अटक करण्यात आले होती. इक्बालवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
एका बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येचा आरोप इक्बालवर होता. मात्र काही काळाने पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता झाली. शासकीय जमिनीवर अनधिकृत बांधकाम करून सारा सहारा मार्केट उभारल्याचा आरोप इक्बालवर होता. या आरोपांमधूनही इक्बाल पुराव्याअभावी २००७ साली सहिसलामत सुटला.
२०१५ साली मोहम्मद सलीम शेख नावाच्या रियल इस्टेट एजंटकडून ३ लाखांची खंडणी आणि मारहाणप्रकरणी देखील इक्बालला अटक झाली होती. या प्रकरणात इक्बाल कासकर सध्या जामिनावर आहे. २०१० मध्ये छोटा राजन टोळीने त्याच्या हत्येचा कट रचला होता. मात्र हा कट पोलिसांनी उधळून लावला.
इक्बाल कासकरला खंडणी प्रकरणातील अटकेनंतर विविध चर्चांना आता रंग आलाय. अरुण गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. अश्विन नाईक देखील खंडणी प्रकरणात सध्या गजाआड आहे. तर छोटा राजन देखील तुरुंगाची हवा खातोय. शिवाय दहशत असलेल्या छोटा राजनच्या काही खास पंटरांचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय तर काही तर काहींना जेलमध्ये टाकलंय.
खंडणी मास्टर रवी पुजारी गेल्या वर्षापासून निष्क्रीय आहे. त्यामुळे मुंबईवर राज्य गाजवणारे तसे "भाई" उरलेच नाहीत. त्यातच आता खंडणीच्या गुन्ह्यात अटक झालेला इक्बाल कासकर चर्चेत आलाय. आतापर्यंत अनेक गुन्ह्यांमधून निर्दोष सुटण्याचा इतिहास पाहता इक्बाल मुंबईत डॉन बनण्याचा तर प्रयत्न करत नाही ना? अशी चर्चा आता सुरू झालीय.