उद्धव ठाकरे राहायला जाण्यापूर्वीच `वर्षा`च्या भिंती वादात
भिंतीवर लिहिल्याचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर नवा वाद सुरू...
रुचा वझे, झी २४ तास, मुंबई : वर्षा बंगला देवेंद्र फडणवीसांनी रिकामा केलाय तर उद्धव ठाकरे अजून 'वर्षा'वर राहायला गेलेले नाहीत. अशातच वर्षा बंगल्याच्या भिंतींवर लिहलेल्या वाक्यांमुळे वाद निर्माण झालाय.
- 'हू इज यूटी' म्हणजे 'यूटी (उद्धव ठाकरे) कोण आहेत
- 'यूटी इज मिन' म्हणजे 'यूटी वाईट आहे'
- आणि 'शट अप' म्हणजे 'गप्प बस'
अशी वाक्य 'वर्षा'च्या भिंतीवर लिहली आहेत. भिंतीवर लिहिल्याचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर संतापलेल्या संजय राऊत यांनी लिहणाऱ्यांचं 'तोंड काळं झालंय' अशी टीका केलीय.
तर 'वर्षा'च्या भिंतींवर लिहून कुणी खोडसाळपणा केलाय का? याची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलीय.
नवे मुख्यमंत्री लवकरच 'वर्षा' बंगल्यात राहायला येतील. त्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बंगल्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा या बंगल्याच्या भिंतींवर ही वाक्य लिहलेली पाहायला मिळाली. वास्तविक पाहता हा फोटो जिथला आहे तिथं हँगर लावलेले आहेत. त्यामुळं ही भिंत 'वर्षा' बंगल्यातल्या आतल्या भागातली असावी, असा अंदाज आहे. यूटी (उद्धव ठाकरे) कोण आहे हे महाराष्ट्राला सांगायची गरज नाही. पण या प्रकरणामुळे भाजप शिवसेनेतली दरी आणखी रुंदावरणार हे मात्र नक्की...