खीर, बर्फी विसरा; ऐन सणासुदीच्या दिवसांत दुधाचे दर वाढले, आता मोजा `इतकी` किंमत
Festive Season : सणावारांना सहसा बहुतांश घरांमध्ये गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. खीर, श्रीखंड, लाडू, गुलाबजाम, रबडी अशा एक ना अनेक पदार्थांची रेलचेल असते. पण, आता मात्र....
Milk Prices Increases : श्रावण महिना आला की सणावारांची रांगच लागते. नागपंचमी, रक्षाबंधन, गोपाळकाला, गणेशोत्सवापासून हे संपूर्ण सत्र पार दिवाळीपर्यंत असतं. काही मंडळी तर वर्षाच्या शेवटापर्यंत अगदी नाताळ, ईद आणि इतर सणही तितक्याच उत्साहात साजरा करतात. सणवार किंवा एखादा खास दिवस म्हटला की घरात मेजवानीचा बेत आलाच. या मेजवानीमध्ये ताटात पुरणार नाही इतक्या पदार्थांची रेलचेल असते. आणि भर पडते ती म्हणजे गोडाच्या पदार्थांची. सणवार आणि कुटुंबीयांच्या आवडीला अनुसरून हे पदार्थ तयार केले जातात.
साधीसुधी खीर असो किंवा मग रबडीमध्ये डुंबलेली रसमलाई असो. प्रत्येक पदार्थ जीभेवर ठेवताच विरघळून सर्वकाही विसरायला लावतो इतक्या सुरेख पद्धतीनं तयार केलेला असतो. अशा या पदार्थांमध्ये बहुतांशी वापरला जाणारा पदार्थ म्हणजे दूध. अगदी लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण दुधाचा वापर करताना दिसतो. पण, आता हा दुधाचा वापरही कमी होणार आहे. कारण, सणासुदीच्या दिवसांमध्येच दुधाचे दर महागले आहेत.
Milk Producers Association (MMPA) तर्फे म्हशीच्या दुधाचे घाऊक दर दोन रुपयांनी वाढले असल्याचं जाहीर करण्यात आलं. 1 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. अधिकृतपणे यासंदर्भातील वृत्त समोर आल्यामुळं सर्वांच्याच चिंता वाढल्या आहेत. म्हशीसाठी लागणारा ओला चारा आणि त्यांचं खाद्य यांच्या दरात वाढ झाल्यामुळं दूध संघटनेकडून एका बैठकीमध्ये दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. ज्यामुळं आता म्हशीच्या सुट्या दुधाची किंमत किरकोळ बाजारात प्रति लिटर 2 ते 3 रुपयांनी वाढली आहे. तर, घाऊक बाजारात 2 रुपयांनी वाढली आहे. शनिवारीच यासंदर्भातील एक बैठक पार प़डली. जिथं MMPA चे उपाध्यक्ष रमेश दुबे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला.
हेसुद्धा वाचा : अंतराळातून पृथ्वीवर परतताच अंतराळवीर सर्वप्रथम काय खातात?
दुधाचे दर वाढल्यामुळं आता याचा परिणाम तयार मिठाई आणि तत्सम दुग्धजन्य पदार्थांवरही होण्याची चिन्हं आहेत. शिवाय अनेक कुटुंबांचा मासिक हिशोबही गडबडण्याची शक्यता आहे. तुमच्याही घरी म्हशीचं दूध येतं का? आकडमोड कराच.