आदित्य ठाकरेंसाठी वरळीचा मतदार संघ का निवडला?
वरळीतूनच आदित्य ठाकरे यांना का उमेदवारी दिली, याचीच जास्त चर्चा आहे.
मुंबई : शिवसेना आणि भाजप युती होणार की नाही, याची खूप चर्चा होती. दोघांनीही २८८ उमेदवारांची चाचपणी करत मुलाखतीही घेतल्या होत्या. त्यात शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी युवा शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा चेहरा पुढे आणला. अनेकवेळा जाहीर कार्यक्रमात तेच शिवसेनेचे पुढचे मुख्यमंत्री असतील असे स्पष्ट केले. तर वरीळत शिवसेनेचा मेळावा झाला त्यावेळी स्वत: आदित्य यांनी मी निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी वरळीतून लढणार आहे. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आदित्यच्या रुपाने सेनेचे 'सूर्ययान' उतरणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे वरळीतूनच आदित्य ठाकरे यांना का उमेदवारी दिली, याचीच जास्त चर्चा आहे.
ठाकरेंच्या घराण्यातून कोणीही याआधी निवडणूक लढविली नव्हती. मात्र, आदित्यच्या रुपाने ठाकरेंच्या पिढ्यांमधला पहिलाच सदस्य निवडणूक रिंगणात उतरला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अर्थात वडिलांनी मुलाला एबी फॉर्म देणे किंबहुना कुठल्याही ठाकरेंनी हाती एबी फॉर्म धरण्याचा हा पहिलाच प्रसंग. ठाकरेंचे नाव उमेदवारी यादीत येण्याचीही ही पहिलीच वेळ. हीच ती वेळ साधत आदित्य ठाकरे निवडणुकीला सामोरे जात आहेत. पण आदित्योदयासाठी वरळीच का?
मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा
१९९० पासून वरळी मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा आहे. वरळी १९९० ते २००९ पर्यंत सलग शिवसेनेचे दत्ताजी नलावडे निवडून यायचे. २००९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर आमदार झालेत. पुन्हा २०१४ मध्ये शिवसेनेच्या सुनील शिंदेंनी वरळी काबीज केली. आता सचिन अहिरही शिवसेनेत आहेत. त्यामुळे हा गड अधिक मजबूत झाला आहे.
नेते, कार्यकर्त्यांची मोठी फळी
याच वरळी मतदारसंघात सुनील शिंदे, किशोरी पेडणेकर, आशिष चेंबूरकर अशा नगरसेवकांसह मोठी फळी कार्यरत आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना खासदार अरविंद सावंतांना या मतदारसंघात ३८ हजारांचं मताधिक्य मिळाले आहे.
अहिरांना घेण्याची मोठी खेळी
या मतदारसंघात प्रमुख अडसर होता तो सचिन अहिर यांचा. पण शिवसेनेने अहिरांना शिवसेनेत घेऊन वरळीतून आदित्योदयाचे पक्के करुन टाकले. त्यामुळे शिवसेनेचे स्थान अधिक बळकट झाले आहे. त्यामुळे येथे कोणताही धोका सध्यातरी दिसताना दिसत नाही. विद्यमान आमदार सुनील शिंदे यांनीही आदित्य ठाकरेंसाठी आग्रह धरत आमदारकीवर पाणी सोडले.
विरोधकांकडे तगडा उमेदवार नाही ?
युतीच्या विरोधात लढण्यासाठी आघाडीकडे या मतदारसंघात उमेदवारच नाही. ही जागा बसपाला सोडण्याचा आघाडीचा विचार आहे. सुरेश माने उमेदवार असू शकतात, बुद्धिजीवी आणि पक्षात प्रभारीपदाची जबाबदारी असली तरी मुंबईकरांशी त्यांचा फारसा संपर्क नाही. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेत अजित पवार यांनी आदित्य यांच्याविरोधात राष्ट्रवादी उमेदवार देणार, असे जाहीर केले. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कोण रिंगणात उतरणार याची उत्सुकता आहे.
मराठी भाषकांचा दबदबा
वरळी मतदारसंघात मराठी भाषकांचा दबदबा आहे. त्यात कोल्हापूर, कोकण पट्ट्यातले सर्वाधिक मतदार आहेत. मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणारी शिवसेना आदित्योदयावेळी अर्थातच गाफील राहणार नाही. म्हणूनच मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर पोहोचण्यासाठीची पहिली पायरी वरळी ठरवण्यात आली आहे.