मुंबई लोकलवरुन राजकारण कशाला?, अनिल देशमुख यांनी रेल्वेला टोकले
सर्वसामान्यांना मुंबई लोकलचा प्रवास कधी सुरु होणार, अशी विचारणा करण्यात येत आहे. अनेकांचे हाल होत आहेत.
मुंबई : सर्वसामान्यांना मुंबई लोकलचा प्रवास कधी सुरु होणार, अशी विचारणा करण्यात येत आहे. अनेकांचे हाल होत आहेत. नोकरी करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागलत आहे. यावरुन विरोधकांनी प्रश्न उपस्थित करुन राज्य सरकारवर टीका सुरु केली. दरम्यान, राज्य सरकारने रेल्वेला रितसह पत्र पाठवून लोकल सुरु करण्याची मागणी केली. मात्र, रेल्वेकडून याला खोडा घातलण्याचे काम करण्यात येत आहे. यावरुन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेल्वेला चांगलेच टोकले आहे. मुंबईमधील लोकल सेवा सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. यामध्ये कोणतंही राजकारण आणले जाऊ नये असेही त्यांनी खडसावले आहे.
अनिल देशमुखांनी यावेळी सांगितले, की राज्य सरकारकडून सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेला वेळापत्रक सूचवले. कधी गाड्या सोडायच्या आणि महिलांसाठी तासाला गाडी सोडण्याचे दिलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र, रेल्वे काहीना काही कारण सांगून बोट दाखवत आहे. लोकल सर्वसामान्यांना सुरू करण्याबाबत रेल्वेने राजकारण करू नये, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बजावले आहे.
लोकल सर्वसामान्यांना सुरू करण्याबाबत राज्य सरकारने सविस्तर वेळापत्रक रेल्वेला दिले आहे. गर्दी होऊ नये या अनुषंगाने हे वेळापत्रक दिले गेले आहे. लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू झाली तर त्यांना दिलासा मिळेल. यात रेल्वेने राजकारण करू नये. यापूर्वीही परप्रांतीय मजूरांना त्यांच्या गावी पाठवताना रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यात वाद झाला होता. आता पुन्हा वादाची ठणगी पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सरसकट लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेला पत्र पाठविले होते. या पत्राला रेल्वेकडून उत्तर आले आहे. २२ आणि २७ ऑक्टोंबरला राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीचा संदर्भ देण्यात आला आहे. रेल्वेने कार्यालयीन वेळा बदलण्या संदर्भात या पत्रात उल्लेख केला आहे. ज्यामुळे गर्दीच्या वेळी अडचण होणार नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. लोकल सुरू झाल्यावर गर्दीचे नियोजन कसे करणार ? अशी विचारणा या पत्राद्वारे रेल्वेने राज्य सरकारला केली आहे.
शिवाय लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि रेल्वे यांची लवकर बैठक व्हावी. यामध्ये गर्दी नियोजन संदर्भात तांत्रिक दृष्ट्या मार्ग काढावा, असेही यात म्हटले आहे. त्याचवेळी राज्य सरकारने पाठवलेल्या पत्रात प्रत्येक तासाला महिला स्पेशल गाडी चालवावी असे म्हटले आहे. पण ते तूर्तास शक्य नाही, असे रेल्वेने राज्य सरकारला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.