मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर रोज पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर जोरदार निशाणे साधले. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल, हे संजय राऊत पहिल्या दिवसापासून सांगत होते. आता अखेर उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, त्याआधी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आहे. माझी जबाबदारी आता संपली आहे. उद्यापासून मी पत्रकार परिषद घेऊन बोलणार नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पत्रकार परिषदेमध्येही संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला. भाजपला मुख्यमंत्री लादता आला नाही. परिवर्तनाची सुरुवात ही महाराष्ट्रातून झाली आहे. शिवरायांचा महाराष्ट्र झुकणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. तसंच मी चाणक्य नाही, तर योद्धा आहे, असं म्हणत राऊत यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. एवढच नाही तर भविष्यात भारतातही ठाकरे सरकार येईल, असं भाकीत संजय राऊत यांनी केलं.


आमचं सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर यशस्वी लॅण्डिग करेल, असं मी म्हणालो होतो, तेव्हा सगळे हसत होते. पण आमच्या सूर्ययानाचं यशस्वी लॅण्डिग झालं आहे. भविष्यात हे सूर्ययान दिल्लीतही उतरलं तर तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.


संजय राऊत यांनी रोज केलेल्या वक्तव्यांवरून भाजप नेत्यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांनीच शिवसेनेची वाट लावली, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. शिवसेनेकडून वारंवार आमच्या सर्वोच्च नेत्यांवर टीका करण्यात आल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली होती. 


शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्थापन केलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाच्या नावासाठी घोषणा केली. यानंतर महाविकासआघाडीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. गुरुवार २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवाजी पार्कवर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.