विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच होणार?
नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर चर्चांना उधाण
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत काय होणार याची आता चर्चा सुरू झाली आहे. सध्या अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. मात्र ते काँग्रेसकडे राहील की नाही याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वााखाली सत्तेवर आलेल्या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारला सव्वा वर्ष उलटले आहेत. अंतर्विरोधामुळे हे सरकार कोसळेल असा दावा विरोधक भाजपकडून सरकार स्थापन झाल्यापासून केला जात होता. हे सरकार फार काळ चालेल याबाबत महाविकास आघाडी सरकारमधील पक्षही सुरुवातीला साशंक होते.
मात्र सव्वा वर्षानंतर हे सरकार स्थिरस्थावर झालंय आणि आता ते पडणार नाही असा विश्वास सरकारमधील पक्षांना आला आहे. असं असतानाच नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीत अध्यक्षपदावरून काय होणार अशी चर्चा सुरू झाली. अध्यक्षपद आता खुलं झालं आहे, त्यावर चर्चा व्हायला हवी असं विधान शरद पवारांनी केल्यानं ही चर्चा सुरू झालीय.
अध्यक्षपदाबाबत सुरू असलेली चर्चा
- काँग्रेस उपमुख्यमंत्रीपद घेऊन अध्यक्षपद शिवसेनेला देईल
- मात्र सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी तयार होण्याची शक्यता नाही
- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मंत्रीपद हवं असल्याने मंत्रीपदाच्या मोबदल्यात अध्यक्षपद राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला देण्याची शक्यता
- अध्यक्षपदाच्या बदल्यात राष्ट्रवादी किंवा शिवसेनेकडून काँग्रेस एखाद दुय्यम खातं घेऊ शकतं
- कोणताही बदल न होता विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहिल अशीही शक्यता आहे
विधानसभा अध्यक्षपदावरून आता महाविकास आघाडीत चर्चा होणार आहे. ही चर्चा होताना सारं काही आलबेल असलेल्या महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्षपदावरून काहीशी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.