मुंबई : राज्य विधीमंडळाचं यंदाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याची राज्य सरकार तयारी करतंय. तसंच हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडण्याचीही शक्यता आहे. आता हे अधिवेशन 7 डिसेंबर ऐवजी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंपरेप्रमाणे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूरला होत असतं, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतामुळे हे अधिवेशन मुंबईत होण्याची चिन्हं आहेत. दुसरीकडे अधिवेशन नागपूरलाच व्हावं यासाठी भाजप नेते आग्रही आहेत. 


उपमुख्यमंत्री अजीत पवार, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, शिवसेना विधिमंडळ गट नेते एकनाथ शिंदे, शिवसेना नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते जयंत पाटील, काँग्रेसचे गट नेते बाळासाहेब थोरात येत्या दोन ते तीन दिवसांत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. 


या भेटीत हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यासंदर्भात तसंच ते मुंबईत घेण्याबाबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


या आधी पावसाळी अधिवेशनात आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरला नागपूर इतं होईलं, असं घोषित करण्यात आलं होतं. पण आता अधिवेशनाला 15 दिवसांचा कालावधी असताना अधिवेशन लांबणीवर टाकण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसंच राज्यातून कोरोना अद्याप पूर्णपणे गेलेला नाही, हा सगळा विचार करता महाविकास आघाडी सरकारला हे अधिवेशन मुंबईत हवं आहे.


कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी देखील हिवाळी अधिवेशन मुंबईत पार पडलं होतं.