आईच्या अकाली निधनाने संपूर्ण कुटुंबावर आघात
चेंबूरच्या पांजरपोळ गौतम नगर परिसरातील याच झोपडपट्टीतील आठ बाय आठच्या घरात राहणा-या घोडेस्वार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अत्यंत सामान्य आणि गरीबीच्या परिस्थितीत राहणा-या शारदा घोडेस्वार यांचा गुरुवारी अंगावर नारळाचं झाड कोसळून दु्र्दैवी मृत्यू झाला.
प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, चेंबूर : चेंबूरच्या पांजरपोळ गौतम नगर परिसरातील याच झोपडपट्टीतील आठ बाय आठच्या घरात राहणा-या घोडेस्वार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अत्यंत सामान्य आणि गरीबीच्या परिस्थितीत राहणा-या शारदा घोडेस्वार यांचा गुरुवारी अंगावर नारळाचं झाड कोसळून दु्र्दैवी मृत्यू झाला.
शारदा या घरातल्या एकमेव कमावत्या होत्या. पती गेल्या काही वर्षांपासून घरापासून दूर गेल्यानंतर संसार आणि मुलांची जबाबदारी शारदा यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. घरोघरी धुणीभांडी करत त्यातून मिळणा-या उत्पन्नातून त्या घराचा गाडा कसाबसा हाकत होत्या. बारावीत शिकणारा सुमित आणि सातवीत शिकणारी स्वप्नाली यांच्या शिक्षणासाठी शारदा घोडेस्वार काबाडकष्ट करत होत्या. मात्र शारदा घोडेस्वार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर आघात कोसळलाय.
आईच्या अकाली निधनामुळे सुमित आणि स्वप्नालीचं जीवन अंधकारमय झालंय. त्यातच घटना घडल्यानंतरही मुंबई पालिका किंवा सरकारकडून ना कोणती मदत मिळाली ना कुठलं आश्वासन...
चेंबूरमध्ये जुलै महिन्यात कांचन नाथ या महिलेचा अंगावर झाड कोसळून मृत्यू झाला होता. आता अवघ्या सहा महिन्यात अशाच एका घटनेत शारदा घोडेस्वार यांचा नाहक जीव गेलाय. त्यामुळे पालिकेचे उद्यान विभाग करतं काय असा सवाल उपस्थित होतोय.