कोमल वावरकर, झी मीडिया, मुंबई : आज 23 ऑगस्ट म्हणजेच जागतिक वडापाव दिन. मुंबईला वडापाव या खाद्यपदार्थासाठी ओळखलं जातं. भारताचा राष्ट्रीय खाद्य पदार्थ म्हणून खिचडीला मानलं जातं. तसेच मुंबई शहराचा वडापाव हा भारताच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. मुंबईचा वडापाव हा अनेकजण फार आवडीने खातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वडापाव सुरू झाला, त्यावेळी तो १० पैशाला विकला जायचा. आज वडापाव पाच रुपयांपासून तर मॉलमध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंत मिळतो. आज वडापाव हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. मुंबई हा खाद्यपदार्थ हा परदेशातून आलेल्या पर्यटकांना सुद्धा आवडतो. 


मुंबईत अनेकजण ऑफिसला जाताना वडापाव खातात. ऑफिसवरून परत घरी जात असतांना भूक लागली असेल, तर वडापाव खाऊन आपली भूक मिटवितात. वडापाव विक्रेता हे दुपारी दोनच्या सुमारास गाडी लावतात. दादर, परळ, गिरगाव, सीएसटी या ठिकाणी मराठी उपाहारगृहांमध्ये फार कमी दरात वडापाव मिळतो. 


मात्र सुरुवातील बरीच वर्षे केवळ बटाटावडा खाल्ला जायचा. त्याला पावाने कधीपासून साथ दिली याबद्दल मतमतांतरे आहेत. दादर वगैरे परिसरातील गिरणी कामगारांनी या मराठमोळ्या पदार्थाला चांगलेच उचलून धरले. 


वडा पाव हा मुंबईसाठी अतिशय प्रिय खाद्यपदार्थ आहे. गरीबांपासून ते श्रीमंतापर्यंत प्रत्येकाजण आवडीने वडापाव खातात. मुंबईत गिरणी कामगारांसाठी वडापाव फार आवडते खाद्य ठरले होते. कारण वडापावला खायला काही प्लेट लागत नाही, ना चमचा. जितकं लवकर बनतो, तितक्याच लवकर खाल्लाही जातो. 


आज मुंबईत दिवसाला जवळपास 18 ते 20 लाख वडापाव खपतात. मुंबईमध्ये कीर्ती कॉलेजजवळचा अशोक वडापाव, श्रीकृष्ण छबीलदास आणि तर सीएसटीसमोरील आराम वडापाव हा फार प्रसिद्ध वडापाव आहे. 



जागतिक वडापाव दिन कधी सुरु झाला? हा प्रश्न अनेकजणांना पडला असला, तरी दादर स्टेशनाबाहेर 1966 साली अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला, असं म्हटलं जातं.


दादरमध्येच त्याच काळात सुधाकर म्हात्रेंचा वडापावही सुरू झाल्याचं जुने मुंबईकर सांगतात. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात बुडवून ते तेलात तळून बटाटेवडे बनवण्यास सुरूवात झाली. त्यानंतर या बटाटेवड्यांना कधी पावची साथ मिळाली यात अनेकजणाचे मतमतांतरे आहेत.


तरुणांना रोजगाराचे साधन आणि राजकीय पाठिंबा : मुंबईमध्ये १९७० ते १९८०च्या काळात गिरण्या बंद पडू लागल्यानं अनेक तरुण बेरोजगार झाले. त्यानंतर तरुणांनी वडापावच्या गाड्या लावल्या आणि या माध्यामातून कुटुंबाचा गाडा हाकू लागले. या व्यवसायला तरुण उदरनिर्वाहचे साधन म्हणून बघू लागले. 


हळूहळू गल्लोगल्ली वडापावच्या गाड्या दिसू लागल्या. मराठी मुलांच्या या धडपडीला शिवसेनेने पाठिंबा दिला. बाळासाहेब ठाकरे यांना कायमच वाटत होतो की, मराठी माणसाने उद्योगात उतरावे. त्यामुळेच वडापावच्या गाड्या टाकण्यास सुरूवात झाली आणि छोटा उद्योगत मराठी माणूस उतरला. 



त्याकाळात सेनेने दक्षिण भारतीयांविरुद्ध भूमिका घेतली होती. मराठी माणूस हा मागे पडत आहे, असे बाळासाहेबांना वाटत होते. मराठी माणसाला मुंबईत पाहिजे तशी जागा मिळत नाही, ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे असा शिवसेना विचार करत होती.


यासाठीच सेनेने मुंबईमधील दादर, माटुंग्यासारख्या परिसरामध्ये असणाऱ्या उडपी हॉटेल्समधील दाक्षिणात्य खाद्यपदार्थांना विरोध करण्यासाठी शिवसेनेने वडापाव प्रमोट कऱण्यास सुरुवात केली. उडप्यांचे पदार्थ खाण्याऐवजी आपला मराठमोळा वडापाव खा, असे आव्हान शिवसेनेने केले. 



शिवसेनेने एकाप्रकारे वडापावचे राजकीय स्तरावर ब्रॅण्डींगच घोषित करून टाकले. शिववडा हा याच पाठिंब्यातून जन्माला आला वडापाव. महानगरपालिकेच्या सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने वडापावच्या गाड्या टाकण्यापर्यंतचे नियम बनविले. 


एकाप्रकारे वडापावला राजकीय पाठिंबाच दिला. आज अनेक ठिकाणी ऑफिसेसच्या कॅन्टीनमध्ये, शाळांच्या कॅन्टीनमध्ये कॉलेजमध्ये वडापाव दिसतो. या वडापावला अनेकजण फार आवडीने खातात.