दीपक भातुसे, मुंबई :  मुंबईत कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुंबई महापालिकेनं आता मोठ्या संकटाची तयारी सुरु केली आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यानं अधिकाधिक लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी व्यवस्था केली जात आहे. मुंबईत वरळीतल्या एनएससीआय म्हणजे राष्ट्रीय क्रीडा संकुलाचं क्वारंटाईन वॉर्डमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे मुंबईतील जी दक्षिण प्रभागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. हा वॉर्ड कोरोनाचा हॉटस्पॉट मानला जात आहे. वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर आदी भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आणि त्यानंतर या भाग सील करून नागरिकांना पोद्दार रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आलं. या भागात कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढत असल्यानं आता जास्तीत जास्त लोकांना क्वारंटाईन करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे मुंबई महापालिकेनं नवे क्वारंटाईन वॉर्ड तयार करण्यास सुरुवात केली आहे.


वरळीच्या एनएससीआय म्हणजे राष्ट्रीय क्रीडा संकुलात अनेक क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रमही होत असतात. या मोठ्या इनडोअर स्टेडियमचं रुपांतर आता क्वारंटाईन वॉर्डमध्ये होणार आहे. तब्बल ५०० बेडची व्यवस्था या स्टेडियममध्ये केली जात आहे.


याबाबत माहिती देताना एसएससीआयचं व्यवस्थापन पाहणारे विरेन शाह म्हणाले, महापालिकेनं आम्हाला याबाबत विचारणा केल्यानंतर आम्ही त्यांना स्टेडियम दाखवले. त्यानंतर क्वारंटाईन वॉर्ड उभारण्याचा निर्णय झाल्यानंतर या संपूर्ण स्टेडियमचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं. सर्व सुविधा पुरवण्यात आल्या. आतापर्यंत अडीच-तीनशे बेड लावण्यात आलेत, आणखी दोन-अडीचशे बेड लागतील. वरळीतील लोकांची व्यवस्था इथं करता येईल. आम्ही जेवढी मदत करता येईल, तेवढी केली आहे.


मुंबईत क्वारंटाईनची गरज आणखी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेनं ही उपाययोजना केली आहे. एनएससीआय म्हणजे राष्ट्रीय क्रीडा संकुलात क्वारंटाईन केलेल्या लोकांशिवाय डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टाफच्या राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.


 



वरळीत कोळीवाडा, जिजामाता नगर, बीडीडी चाळ आदी परिसरात दाटीवाटीनं लोक राहतात. लोक दिवसभर घरी राहत नाहीत. अशा वेळी काही लोकांची इथं सोय करण्यात येणार आहे. पुढचा धोका लक्षात घेऊन महापालिकेनं ही व्यवस्था केली आहे.