Yashwant Jadhav | `मातोश्री`ला दोन कोटींचे गिफ्ट,आईचा हिशोब ठेवणारा आधुनिक श्रावण बाळ
Yashwant Jadhav | यशवंत जाधव यांनी मातोश्रीला २ कोटी रुपये आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याची नोंद त्यांच्या खासगी डायरीत सापडलीय. त्यामुळं इन्कम टॅक्ससह सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हे नेमकं काय गौडबंगाल आहे
मुंबई : बातमी आहे राजकारणातल्या यशवंत लेकाची..! मुंबई महापालिकेच्या माजी स्थायी समिती अध्यक्षांची..! अर्थात यशवंत जाधवांची, यशवंत जाधव यांनी मातोश्रीला २ कोटी रुपये आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याची नोंद त्यांच्या खासगी डायरीत सापडलीय. त्यामुळं इन्कम टॅक्ससह सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हे नेमकं काय गौडबंगाल आहे. पाहूयात
मातोश्री'ला दोन कोटींचे गिफ्ट
आईचा हिशोब ठेवणारा आधुनिक श्रावण बाळ म्हणजे शिवसेना नेते यशवंत जाधव होय. त्यांच्या माझगावच्या घरी इन्कम टॅक्सनं अलिकडेच छापे घातले तेव्हा तिथं एक डायरी सापडली. या डायरीत कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद नोंदी आढळल्या. मात्र यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मातोश्रीला दोन कोटी रुपये दिल्याची नोंद होय. आता ही मातोश्री कोण? तर जाधवांचं म्हणणंय की ही मातोश्री म्हणजे त्यांची आई आहे. आता या त्यांच्या मातोश्रीच्या नावानं त्यांनी डायरीत काय काय लिहून ठेवलंय ते पाहूयात.
या डायरीमध्ये गुढीपाडव्याला 'मातोश्री'ला 2 कोटी रुपये दिल्याची नोंद
शिवाय 'मातोश्री'ला 50 लाख रुपयांचं घड्याळ गिफ्ट केल्याची नोंदही डायरीत आहे. याबाबत इन्कम टॅक्स अधिका-यांनी यशवंत जाधवांकडे विचारणा केली. तेव्हा 'मातोश्री म्हणजे माझी आई' असं जाधवांनी सांगितलं.
नववर्षानिमित्त गिफ्ट वाटपासाठी हे 2 कोटी रुपये वापरले. शिवाय आईच्या नावानं घड्याळं वाटली, असा दावाही त्यांनी केला.
अधिकाऱ्यांचं समाधान नाही.
इन्कम टॅक्स अधिका-यांचं या उत्तरांनी समाधान झालेलं नाही. कारण शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाचं नाव देखील मातोश्री असं आहे. त्यामुळं यशवंत जाधवांनी ज्या मातोश्रीला 2 कोटी रुपये आणि 50 लाखांचं घड्याळ गिफ्ट केलं, त्या 'मातोश्री'वरून संशयाचं वातावरण निर्माण झालंय.
कारण आईला गिफ्ट दिल्यास त्याची नोंद कुणीही खासगी डायरीत करून ठेवत नाही. त्यामुळे यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत...
यशवंत जाधवांनी कोरोना काळात कोट्यवधींच्या मालमत्ता खरेदी केल्या. या मालमत्तांबाबत 'झी २४ तास'नं सर्वात आधी वृत्त दिलं होतं. मात्र आईला दोन कोटींचं गिफ्ट देणं आणि ते डायरीत लिहून ठेवणारे यशवंत जाधव हे आधुनिक श्रावण बाळ असल्याची चर्चा आता राजकीय विश्वास रंगू लागलीय.