मुंबई :  मुंबई प्रवेशद्वारावरील पाच पथकर नाक्यावर प्रत्यक्ष न जाता आता तुम्हाला मासिक पास (Toll  Monthly Pass) काढता येणार आहे. तोही घरबसल्या. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ही नवी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे टोल नाक्यावर रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्ही ऑन लाईन पध्दतीने मासिक टोल पास खरेदी (Monthly Pass Online without going to the Toll Naka) आणि त्याच वेळी ऑन लाईन कार्यान्वित करण्याची (online purchase and activation) पध्दत  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सुरु केली आहे.  मुंबई प्रवेश द्वारावरील वाशी, ऐरोली, मुलुंड, मुलुंड (एल.बी.एस) आणि दहिसर या पथकर नाक्यावरुन मासिक टोल पास घेऊन प्रवास करणाऱ्या वाहन धारकांच्या सोयीसाठी फास्टॅगमध्येच मासिक पासची सुविधा यापूर्वीच महामंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. 


आता वाहनाधारकांना घर बसल्या ऑन लाईन पध्दतीने बँकेच्या माध्यमातून पैसे जमा करुन एका टोल नाक्याचा अथवा सर्व टोल नाक्याचा (Single or Multi toll pass) फास्टॅगमध्ये खरेदी आणि त्याचवेळी ऑन लाईन कार्यान्वित (Activation) करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली असून प्रचलित पध्दतीप्रमाणे 3 दिवसात टोल नाक्यावर जावून पास कार्यान्वित करणेची अट देखील रद्द केली आहे. 


याशिवाय वाहनाच्या समोरील काचेवर टोल नाक्याच्या कंत्राटदाराचे कलर स्टीकर लावण्याची अट देखील रद्द केली आहे, अशी माहिती म.रा.र.वि.महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक  विजय वाघमारे यांनी दिली. या सुविधेबाबत अधिकची माहिती देतांना पथकर विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक कमलाकर फंड यांनी सांगितले की, या सुविधेचा फायदा मुंबईमधील साधारणपणे 25,000 वाहनधारकांना होईल. पथकर नाक्यावर मासिक पास घेतेवेळी होणाऱ्या गर्दीमुळे कोवीडचा संसर्ग होवू नये यासाठी मुद्दाम हा निर्णय घेतला असून या सुविधेचा जास्तीत जास्त वाहन धारकांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले आहे.


मुंबई पथकर नाक्यांवरील गर्दीच्या वेळची वाहतूक कोंडी कमी करुन विना थांबा प्रवास सुविधा देणेसाठी महामंडळाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून मुंबईमधील वाहनाधारकांनी फास्टॅग वापरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला असून दिवसेंदिवस फास्टॅग वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबई पथकर नाक्यांवरील वाहतूक कोंडी कमी होत असलेली दिसून येत आहे.