वसई :  वसईच्या सुरुची बाग येथील समुद्र किनाऱ्यावर पार्टीसाठी गेलेल्या तरुणांचा अतिउत्साह एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत गणेश खोत या  तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला तर इतर पाच जणांचा जीव वाचवण्यात यश आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी दुपारी वसईतल्या पाच ते सहा तरुणांचा ग्रुप पार्टीसाठी वसईच्या सुरुची बाग येथील समुद्रकिनाऱ्यावर गेला होता. अतिउत्साहात पार्टीनंतर संध्याकाळच्या सुमारास सर्व तरुण समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने या तरुणांपैकी एक जण पाण्यात बुडाला तर इतरांचे प्राण वाचले. गणेश पांडुरंग खोत असे बुडालेल्या तरुणाचे नाव असून तो वसई पूर्व गोखीवरे परिसरात राहणारा आहे.


रात्री उशिरापर्यंत बुडालेल्या तरुणाचा  मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू होते मात्र आज सकाळी त्याचा मृतदेह समुद्रकिनाऱ्यावर आला. या घटनेची नोंद अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.