Baba siddiqui Murdered: राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोंबरला गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई याच्या गॅंगकडून या गुन्ह्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली. एका कथित फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती देण्यात आली. मुंबई पोलिसांनी तपास करत यातील आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणात दररोज मोठे खुलासे समोर येत आहेत. बाबा सिद्धीकी हत्येचा तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे. पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक केली.तपासादरम्यान गोळीबाराच्या दिवशी नेमके काय झाले? याचा घटनाक्रम आरोपींनी सांगितला आहे. पोलीस सूत्रांकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 


झिशान गाडीत लगेच बसला आणि...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबा सिद्दिकी यांच्या मारेकऱ्यांच्या मोबाईलमधील स्नॅपचॅट अॅपमध्ये झिशान सिद्दीकी यांचा फोटो होता. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या ऐवजी झिशानची हत्या करण्याचा प्लान होता का? असा प्रश्न उपस्थित झाला. त्या दिशेने पोलिसांनी चौकशी केली. यात मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दिकी हाही मारेकऱ्यांच्या रडारवर होता. पण खेरवाडी येथील कार्यालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या गाडीत झिशान लगेच बसल्यामुळे त्याच्यावर हल्ला करता आला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 


झिशान निशाण्यावर न आल्याने मारेकऱ्यांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला केला. बाबा सिद्दिकी यांची गाडी झिशानच्या कार्यालयापासून काही अंतरावर पार्क करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी हे कार्यकर्त्यांसह चालत जात होते. यावेळी आरोपींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. 


दोघांपैकी एकाची हत्या 


आरोपीच्या स्नॅपचॅट अकाऊंटवर झिशान आणि त्याच्या वाहन क्रमाकांचा फोटो आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीची चौकशीत केली असता, बाबा सिद्दिकी किंवा त्याचा मुलगा झिशान सिद्दिकी या दोघांपैकी एकाची हत्या करायची आहे, असे त्यांना सांगण्यात आले होते,अशी माहिती समोर आली. 


 झिशानपेक्षा बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला करणे सर्वात सोपे 


दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दिकी हे खेरवाडी येथील कार्यालयात आले होते, तेव्हा झिशानपेक्षा बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला करणे सर्वात सोपे असल्याचे आरोपींच्या लक्षात आले. बाबा सिद्दीकी यांनी थोड्या अंतरावर गाडी उभी केली होती. त्यामुळे त्यांच्यावर गोळ्या झाडणे आरोपींना तुलनेत सोयीस्कर गेले असावे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. यातील आणखी काही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.