Zydus Cadila Vaccine Price :  कोरोनाविरुद्धच्या (Covid-19 Vaccination) लढाईत भारतासाठी एक चांगली बातमी आहे. 12 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. कारण परवानगी मिळालेल्या झायडस कॅडिलाच्या 'झायकोव्ह डी' (Zykov-D) लसीच्या 1 कोटी डोसची ऑर्डर केंद्र सरकारनं दिली आहे. त्यामुळे केंद्राच्या कोविड लसीकरण कार्यक्रमात लहान मुलांचा लवकरच समावेश होण्याची शक्यता वाढली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झायडस कॅडिला कोरोना लस 'Zykov-D' ची किंमत निश्चित करण्यात आली आहे. ही लस डीएनएवर आधारित देशातील पहिली लस आहे. या एका डोसची किंमत 358 रुपये आहे. लसीसाठी सुईची गरज नाहीये. तर जेट अॅप्लिकेटरनं लस दिली जाते. अॅप्लिकेटरचं नाव 'फार्माजेट' आहे याचे 93 रुपयेही लसीच्या किंमतीत समाविष्ट आहेत. 28 दिवसांच्या अंतरानं या लसीचे 3 डोस द्यावे लागतात. 


Zydus Cadila चे व्यवस्थापकीय संचालक शर्विल पटेल यांनी म्हटलं आहे, आम्हाला Zycov-D सह सरकारच्या लसीकरण कार्यक्रमात सहभागी होताना आनंद होत आहे. आम्हाला आशा आहे की सुई-मुक्त लसीकरणामुळे आणखी अनेक लोकांचं लसीकरण होऊ शकेल आणि COVID-19 विरूद्ध संरक्षण मिळू शकेल, विशेषत: 12 ते 18 वयोगटातील मुलं आणि तरुणांना याचा फायदा होईल.


Zycov-D ला 20 ऑगस्ट रोजी औषध नियामकाकडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली. Zycov-D ही 12 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांच्या लसीकरणासाठी भारताच्या औषध नियामकाने मंजूर केलेली पहिली लस आहे. सुरुवातीला प्रौढांच्या लसीकरणाला प्राधान्य दिलं जाणार आहे.


देशात झालेल्या प्रभावी लसीकरणामुळे अजूनतरी कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यात यश आलंय. मुलांचंही लसीकरण झालं, तर शाळा पूर्ण क्षमतेनं लवकरात लवकर सुरू करता येतील.