Mumbai Water Problem : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा (Water Supply) करणारे तलाव (Lake) ओसंडून वाहत असल्याच्या अर्थात 'ओव्हरफ्लो' (OverFlow) होत असल्याच्या बातम्या समाज माध्यमांद्वारे आणि काही प्रसारमाध्यमांद्वारे दाखवल्या जात आहेत. तर काही माध्यमांद्वारे मुंबईची पाण्याची चिंता मिटली असल्याचा आशय मांडणाऱ्या बातम्या प्रसारित होत आहेत. यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) जल अभियंता खात्याद्वारे खुलासा करण्यात आला आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी कोणताही प्रमुख तलाव सध्या ओव्हरफ्लो नाही. तसंच जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मुंबईची पाण्याची चिंता मिटली असं म्हणता येणार नाही असं मनपाने म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईला पाणीपुरठा करणारे तलाव किती भरले आहेत, याची माहिती मनपाने दिली आहे. त्यानुसार विहार तलाव 100 टक्के आणि  तुळशी तलाव 99 टक्के भरलेला आहे. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या एकंदरीत पाणीपुरवठ्याचा विचार करता विहार आणि तुळशी तलावांमधील 'जलसाठा' हा अत्यल्प आहे. त्यामुळे या दोन तलावांमधील पाणीसाठ्याच्या आधारे निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही असं मनपाने म्हटलंय.


आज करण्यात आलेल्या मोजणीनुसार प्रमुख तलावांपैकी सर्वात मोठे तलाव असणाऱ्या 'अप्पर वैतरणा' तलावातील जलसाठा 71.09 टक्के आहे. तर भातसा तलावातील जलसाठा 78.16 टक्के आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व सातही तलावांमध्ये एकंदरीत जलसाठा हा 83.51 टक्के आहे. ही बाब लक्षात घेता मुंबईची पाणी चिंता ही काही प्रमाणात निश्चितपणे दूर झाली असली, तरी अद्याप पूर्णपणे मिटलेली नाही.


दरवर्षी 1 ऑक्टोबर ही तारीख पाणीपुरवठा नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची तारीख असून या दिवशी सर्व तलावांमधील जलसाठा 100 टक्के असल्यास पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही बाब समाधानकारक मानण्यात येते. त्यामुळे यावर्षी ऑक्टोबर महिन्यातील जलसाठा किती असेल त्यावर पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन अवलंबून असतं, अशी माहिती जल अभियंता खात्याने दिली आहे. 


त्याचबरोबर काही तांत्रिक कारणांमुळे आणि परिरक्षणाच्या आवश्यकतांमुळे तलाव पूर्णपणे भरलेले नसताना देखील तलावांचे दरवाजे (गेट) काही प्रमाणात उघडावे लागतात. यंदाच्या पावसाळ्यात 'हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जलाशय' अर्थात 'मध्य वैतरणा' तलावाचे 2 दरवाजे या आठवड्यात उघडण्यात आले होते. त्यातून विसर्ग झालेले पाणी हे त्याच नदी प्रवाहात खालच्या बाजूला असणाऱ्या 'मोडकसागर' तलावात साठविण्यात आले.  पाणी हे तांत्रिक कारणांमुळे सोडण्यात आलं होतं. मात्र, काही माध्यमांनी त्याचा अर्थ तलाव ओसंडून वाहू लागला असा काढला. जो चुकीचा आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 


तलावातील पाण्यची स्थिती लक्षात घेता महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याने मुंबईकरांना पाणी जपून आणि काळजीपूर्वक वापरावं अशी मागणी केली आहे.