मुंबई: विश्वास म्हणजे नेमकं काय ? मार्कंडेयची ही गोष्ट ऐकल्यावर याच अर्थ नेमका काय ते तुम्हाला नक्कीच कळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्रिकांडू ऋषी आणि त्यांची पत्नी मरुध्वती यांना अनेक वर्ष मुल होत नव्हतं. मुल व्हावं यासाठी या दोघांनी शंकराची कठोर तपश्चर्या केली. या दोघांच्या तपश्चर्येला भगवान शंकर प्रसन्न झाले, आणि त्यांनी म्रिकांडू ऋषी आणि मरुध्वतीची मागणी मान्य केली. 


पण ही मागणी मान्य करताना शंकरानी या दोघांसमोर 2 पर्याय ठेवले. तुम्हाला जास्त आयुष्य असलेला पण गतीमंद आणि मुका मुलगा हवा आहे का कमी आयुष्य असलेला हुशार मुलगा हवा आहे ?


म्रिकांडू आणि मरुध्वती यांनी हुशार पण कमी आयुष्य असलेल्या मुलाचा पर्याय मान्य केला, आणि या दोघांना एक मुलगा झाला. या मुलाचं नाव त्यांनी मार्कंडेय ठेवलं. 


शंकरानं सांगितल्याप्रमाणेच मार्कंडेय हुशार निघाला. तो जेव्हा 16 वर्षांचा झाला तेव्हा त्याचे आई-वडिल म्हणजेच म्रिकांडू आणि मरुध्वती उदास झाले. कारण मार्कंडेयचा मृत्यू जवळ आल्याचं त्यांच्या लक्षात आलं. 


आपल्या दु:खी पालकांना बघितल्यानंतर मार्कंडेयनं त्यांना याचं कारण विचारलं. म्रिकांडू ऋषींनीही मग सगळा प्रकार मार्कंडेयला सांगितला. आपण शंकराची तपश्चर्याकरून त्याचं मन जिंकू, तुम्ही काळजी करु नका, असा धीर मार्कंडेयनं आपल्या पालकांना दिला, आणि मार्कंडेय शिवलिंगाजवळ तपश्चर्येला बसला. 


मार्कंडेय तपश्चर्या करत असतानाच तिकडे यम आला आणि त्याला घेऊन जायला लागला. पण मार्कंडेय मात्र शिवलिंगाला पकडून बसला. मार्कंडेयाची ही तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी 16 वर्षाच्या मार्कंडेयला अमर व्हायचं वरदान दिलं. 


या गोष्टीचा बोध काय ?


कोणतीही गोष्ट श्रद्धेनं केली तर अशक्य असं काहीच नाही. कधीही आशा सोडू नका, कितीही अंधकार असेल तरी निराश होऊ नका. आशा असेल तरच विश्वास निर्माण होतो, आणि विश्वास असेल तरच आयुष्य चांगलं होतं.