अजितदादांना नटसम्राट भेटतात तेंव्हा....!
विश्वासू सहकारी आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या लढाईत ज्याच्या भरोशावर उतरायचे त्या सरसेनापती आझमभाईनी शत्रू पक्षाशी हातमिळवणी केल्यामुळे राजे अजितदादा उदास नजरेने राजवाड्यात बसले होते...आधी लक्ष्मण गेला नंतर महेश आणि आता आझम...!
कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : विश्वासू सहकारी आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या लढाईत ज्याच्या भरोशावर उतरायचे त्या सरसेनापती आझमभाईनी शत्रू पक्षाशी हातमिळवणी केल्यामुळे राजे अजितदादा उदास नजरेने राजवाड्यात बसले होते...आधी लक्ष्मण गेला नंतर महेश आणि आता आझम...!
त्यांच्या पाठोपाठ त्यांचे पाठीराखेही गेले या विचाराने राजे अजित आणखी उदास होत होते...! ज्या पिंपरी चिंचवड नगरीच्या विकासासाठी झटलो तिथूनच आपलं राज्य खालसा करण्यासाठी अनेक जण सरसावलेत ते ही आपलेच हा विचार राजा अजित यांना स्वस्त बसू देईना....! विचारांचं काहूर डोक्यात घोंगावत असताना काय करावं या विचारातच त्यांनी टीव्ही चालू केला...! टीव्हीवर नटसम्राट चालू होता...! गद्दारीचा विचार मनात घोळत असतानाच राजे अजित दादा नटसम्राट पाहू लागले...!
कित्येक वर्ष रंगभूमीवर अभिनयाचे अनभिषिक्त सम्राट म्हणून नटसम्राट आप्पासाहेब बेलवकर यांचा वावर पाहताना राजे अजित दादा यांना त्यांचा पिंपरी चिंचवड मधला स्वतःच्या उदयाचे दिवस डोळ्यासमोरून जाऊ लागले...! आपला ही पिंपरी चिंचवड मधला गेल्या १५ वर्षातला वावर राजकारणातील अनभिषिक्त सम्राटा सारखाच होता याची आठवण त्यांना झाली...! त्याच विचारात असताना नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकरांचे दिवस फिरल्याचे राजे अजित पाहू लागले...! मुलाच्या घरातून नटसम्राटाला जावं लागलं....! मुलीच्या घरी गेलो तर चोरीचा आरोप झाला...! अरे अरे.... रंगभूमीवर अभिनयाच्या जोरावर अधिराज्य गाजवणारा आणि किती तरी प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या नटसम्राटाला शेवटी घर ही मिळू नाही हे पाहताना राजे अजित उदास झाले...! नटसम्राटाचा करून अंत तर राज्यांच्या मनाला चटका लाऊन गेला...!
नटसम्राट पाहत असतानाच आरामखुर्चीवर राजे अजितदादा यांनी डोळे मिटले...! नटसम्राट पाहिल्याने राजे अजित अधिकच उदास झाले...! अरे आपण ही पुणे, पिंपरी चिंचवडच्या राजकीय रंगभूमीवर अनभिषिक्त सम्राट म्हणून वावरलो... लक्ष्मण काय महेश काय किंवा आझम काय य सर्वांना भरभरून दिलं...! सगळ्यांना अमर्याद अधिकार दिले...! शून्यातून त्यांना ओळख दिली आणि आज गरज असताना सर्वानी साथ सोडली...! फक्त साथ सोडली असं नाही तर राजकीय पटलावर तलवार चालवायची कशी हे ज्यांना शिकवलं त्यांच्याच तलवारी आपल्यावर रोखल्या गेल्या.... रंगभूमीच्या नटसम्राटाच्या नशिबी तर करुण अंत आला...! आता आपल्या नशिबी महापालिका लढाईत काय येणार हा विचार मनाला शिवला आणि राजे अजित अधिकच दु:खी झाले..! आणि या विचारातच त्यांना ग्लानी आली...!
आणि अचानक राजे अजित दादा यांच्या समोर नटसम्राट अवतरले...! अरे अजित काय झालं...? नटसम्राटाच्या या प्रश्नांनी राजे अजित यांना काय बोलावे कळेना...उदास मुद्रेने राजे अजित सांगू लागले....! पिंपरी चिंचवड नगरीचा मी गेल्या कित्येक वर्षापासूनच कारभारी...नगरीच रूप मी पालटवलं...सर्वत्र शहराचं कौतुक झालं...! पण त्याची दखल कोणी घेतली नाही...लोकसभा विधानसभा निवडणुकीत पराभवाचे धक्के बसले आणि आपल्या समजलेल्या सेनापतींनी माझ्यावरच तलवारी उपसल्या...जीवनातल्या महत्वपूर्ण लढाईला जात असतानाच ही गद्दारी....सर्व संपल्यासारखं वाटतेय...! लढाई पूर्वीच पराभव झाल्यासारखे वाटतंय...! राजे अजित यांच्या तोंडून ही उदास भाषा ऐकून नटसम्राट उसळले...! रंगभूमीवर साकारलेल्या विल्यम शेक्सपिअर च्या पत्रातला आवेश घेत नटसम्राट ओरडले... अरे उदास काय होतोय...! मी जीवापाड जपलेल्या माझ्या जवळच्यांनी माझा घात केला खरा पण सावरायला वेळ नव्हता... तुझे सेनापती गद्दार झाले खरे पण लढणारे मावळे तुझ्या बरोबर आहेत... ! तुला सावरायला वेळ आहे... राजकीय पटलावर तूच दादा आहेस हे दाखवायची ही वेळ आणि तू असा उदास होतोस... उठं उदास होऊ नकोस, तू लढाई जिंकशील पण आत्मविश्वास ढळू देऊ नको...! नटसम्राटाच्या या वाक्यांनी राजे दादांना बळ आलं... ते नटसम्राटाच्या हातात हात घ्यायला उठले पण नटसम्राट नव्हते...!
काय झाले या विचारातच राजे अजित यांनी डोळे उघडले... स्वप्नात का असेना नटसम्राट भेटले आणि आपल्याला नवी उमेद मिळाल्याची जाणीव राजे अजित यांना झाली... अरे स्वार्थासाठी शत्रूशी हात मिळवणी करणाऱ्या गद्दारांना माझा खरा मावळा धडा शिकवेल हा विचार राजांना बळ देऊन गेला आणि पिंपरी चिंचवड च्या राजकीय पटलावरचे आपणच नटसम्राट ही भावना पुन्हा एकदा राजे अजित यांना सुखाऊन गेली...!