रवी कोपला.. `महाराजा` चोपला !!
संसदेचा गुरूवारचा दिवस दोन घटनांनी गाजला...
रामराजे शिंदे, झी मिडीया, दिल्ली : संसदेचा गुरूवारचा दिवस दोन घटनांनी गाजला...
एक... शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या अधिका-याला जोड्यानं (सॅंडल) मारलं.
दुसरा... शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्यानं संसदेच्या आवारात खासदार औवेसी यांना टपली मारली. या दोन्ही घटनांमध्ये केंद्र स्थानी होती शिवसेना..
सरांची 'शिकवण'
शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांना सर म्हणून ओळखलं जातं. राजकारणात पाऊल टाकण्यापूर्वी ते उमरग्यातील ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकवत असे. शिकवणी सोडून गायकवाडांनी शिवसेनेचा बाण हाती घेतला. रवी सर आणि वाद यांचं नाते घनिष्ठ आहे. एअर इंडियाच्या अधिका-याला जोड्याने मारल्यामुळे रविंद्र गायकवाड सध्या देशभर गाजत आहेत.
दिनांक २३ मार्च २०१७. रवी सर पुण्यावरून दिल्लीला एअर इंडियाच्या विमानानं निघाले. एअर इंडियाच्या बिझनेस क्लासचं तिकीट दिलं होतं. परंतू त्यांना इकॉनॉमी क्लासमध्ये बसावलं. F1 हा सीट क्रमांक रविंद्र गायकवाड यांना देण्यात आला होता. बिझनेस क्लासचं तिकीट असूनसुद्दा इकॉनॉमी क्लासमध्ये बसवल्याचा राग रविंद्र गायकवाड यांना अनावर झाला. बिझनेस क्लाससाठी ५०-६० हजार रूपये आकारले जातात परंतू इकॉनॉमी क्लासमध्ये कमी पैसे आकारले जातात. हा लोकांचा पैसा आहे, त्यामुळे हिशोब मागितला असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. गायकवाड यांचं एम.कॉम झालं आहे. कॉमर्सचं शिक्षण घेतल्यामुळे हिशोबातील तफावत त्यांना लगेच दिसून आली. खरं तर, गायकवाड यांनी नियम काय आहे, याबद्दल एअर इंडियाच्या कर्मचा-यांना विचारणा करून विमान एक तास रोखून ठेवले. त्यानंतर गायकवाड यांनी आपल्या मूळ स्वभावानुसार अधिका-याशी वागले. त्यात पुन्हा अधिका-यानं मोदी को बताऊंगा... म्हटल्यावर गायकवाड यांच्यातील शिवसैनिक जागा झाला. मोदीचं नाव घेऊन धमकी दिल्यामुळं दोन कानशिलात लगावल्या. मात्र, बाहेर आल्यानंतर रविंद्र गायकवाड यांनी या घटनेचं अतिशयोक्ती वर्णन करून सांगितलं. दोन नव्हे तर २५ वेळा सँडलनं मारल्याचं वक्तव्य केलं. हेच वक्तव्य त्यांच्या अंगलट आलं. बिझनेस क्लासचं तिकीट असताना इकॉनामी क्लास का दिला, याची नियमावली मागून कायद्याची भाषा करणा-या गायकवाडांनीच दुस-या क्षणी अधिका-यावर हात उचलून कायदा मोडला. संध्याकाळी चारचं एअर इंडिया फ्लाईटचं तिकीट असून मला कोण रोखणार, अशा शब्दात एअर इंडियाला आव्हान देणा-या या शिवसेनेच्या वाघाला शेपूट आत घेऊन पळ काढावा लागला. लपत छपत रेल्वेने प्रवास करत घर गाठण्याची वेळ गायकवाडांवर आली.
सामान्य जनतेचा आवाज संसदेत उठवण्याचं काम लोकप्रतिनिधी करतो. परंतू इथे कानाखाली आवाज काढण्याचं काम रविंद्र गायकवाड यांनी केलं. गायकवाड हे मूळ शिक्षकी पेशातले असल्यामुळे मुलांच्या कानाखाली लगावण्याची सवय राजकारणात आल्यानंतरही गेली नसल्याचे दिसते. सार्वजनिक जीवनात वागताना तारतम्य बाळगावं लागतं, याची शिकवण रवी सरांना देण्याची वेळ आता शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांवर आली आहे.
एअर इंडियाचं कुठं चुकलं?
एअर इंडियाचं काम म्हणजे निवृत्तीनंतर चारधाम यात्रा करण्यासाठी निघालेल्या ज्येष्ठ नागरिकांसारखं. एअर इंडिया डबघाईला जाण्याचं कारणसुद्धा एअर इंडियाचं व्यवस्थापन आणि कर्मचारी आहेत. सोयी सुविधा नीट दिल्या जात नाही, उलट अरेरावी भाषा. याचा अनुभव अनेक खासदारांना आला. लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांनासुद्धा हैद्राबाद एअरपोर्टवर असाच अनुभव आला. त्यांनी रितसर तक्रार केली. त्या एअर इंडियाच्या अधिका-याला निलंबित करण्यात आलं. बिझनेस क्लासचं तिकीट असतानाही रविंद्र गायकवाड यांना इकॉनॉमी क्लासमध्ये बसवलं गेलं, यामुळे माफी मागून एअर इंडियाच्या कर्मचा-यांना हे प्रकरण मिटवता आलं असतं. परंतू आता मोदी सरकार आले आहे, या तो-यात आलेल्या अधिका-यानं गायकवाड यांच्याशी हुज्जत घातली आणि त्यांना शिवसेनेचा प्रसाद मिळाला. परंतू एअर इंडिया किंवा फेडरेशन आफ इंडियन एअरलाईन्स कोणत्याही नागरिकाचे तिकीट रद्द करू शकत नाही. हे तर लोकप्रतिनिधी आहेत. कोणत्याही घटनेची चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच आरोपी घोषित करता येत नाही. रविंद्र गायकवाड यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी चौकशी पूर्ण होण्याच्या आधीच गायकवाड यांच्यावर विमान प्रवासाला बंदी घालण्याची घाई विमान कंपन्यांनी केली. विशेष म्हणजे, फेडरेशन आफ इंडियन एअरलाईन्सचे एअर इंडिया सदस्य नाही. फेडरेशन आफ इंडियन एअरलाईन्समध्ये जेट एअरवेज, गो एअर, इंडीगो, जेटलीट आणि स्पाईसजेट या कंपन्या येतात. तरीही या सर्व विमान कंपन्यांनी गायकवाड यांच्यावर बंदी घातली. एअर इंडियाची नाराजी स्वाभाविक आहे परंतू अन्य विमान कंपन्यांनी बंदी का घातली? या विमान कंपन्यांना सरकारकडून पाठबल मिळालंय. सरकारच्या जीवावरच विमान कंपन्यांची दादागिरी चालू आहे. खासदार गायकवाडांनी हात उचलून कायदा मोडला परंतू विमान कंपन्या गायकवाड यांना प्रवासाला बंदी घालून कायद्याचं आणि मानवाधिकाराचं उल्लंघन करत आहेत, याचं काय?
एअर इंडियाच्या खांद्यावर भाजपची बंदूक
भारतीय जनता पार्टीने सुद्धा कधी नव्हे ती लगेच दखल घेतली. हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू यांनी खासदारांवर कारवाई करण्याचं वक्तव्य केलं. मंत्र्यांच्या या ग्रीन सिग्नल नंतर एअर इंडियाला आणखी चेव चढला. एअर इंडियाकडून रविंद्र गायकवाडांविरोधात एफआरआय दाखल करण्यात आली. एअर इंडिया व्यतिरिक्त अन्य विमान कंपन्यांनीही गायकवाड यांच्यावर बंदी घातली. ही झुंडशाहीच म्हणावी लागेल. हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू यांनी मनावर घेतलं असतं तर चार तासात प्रकरण निवळलं असतं. परंतू शिवसेनेला बदनाम करण्याची संधी भाजप कसं घालवणार? एअर इंडिया हवाई वाहतूक मंत्र्याचं ऐकत नाही का.. त्यांच्या आदेशाला काही किंमत नाही का.. गजपती राजू यांनी एअर इंडियाला सबूरीचा सल्ला का दिला नाही.. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्याला एअऱ इंडियाला हाताळण्यात अपयश का आलं... या सगळ्यांची उत्तर एकच आहे की, शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड आणखी खोलात अडकतील, अशीच सोय भाजपनं केली. भाजप सरकार या विमान कंपन्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून शिवसेनेला लक्ष्य करतंय.
रवी सरांचं सोयीचं राजकारण
उस्मानाबाद लोकसभा हा मतदारसंघ १९९६ पासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहीला. यापूर्वी शिवाजी कांबळे दोन वेळा शिवसेनेकडून लोकसभेत गेले. त्यानंतर कल्पनाताई नरहरे आणि आत्ता रविंद्र गायकवाड यांनी दिल्ली गाठली. परंतू या सर्व खासदार महोदयांना उस्मानाबादमध्ये एकसुद्धा उद्योग आणण्यात यश मिळालं नाही. मुस्लिम आणि हिंदूं मतांचं ध्रुवीकरण करून नेहमी शिवसेनेनी पोळी भाजून घेतली. रविंद्र गायकवाड यांनीही मतदारसंघातील लोकांची निराशाच केली आहे. विकासाचा कोणताही अजेंडा त्यांच्याकडे नाही. खंरतर ओमराजे निंबाळकर यांना खासदारकीचं तिकीट हवं होतं. पद्मसिंह पाटील यांच्यावर ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप आहे. त्यामुळे पद्मसिंह पाटील यांना पराभवाची धूळ चाटण्यासाठी ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पद्मसिंह पाटील आणि शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांचे साटेलोटे जगजाहीर आहे. ओमराजे पेक्षा रविंद्र गायकवाड बरा... असं म्हणून राष्ट्रवादीनं रविंद्र गायकवाडांना हवा दिली. ओमराजेंना तिकीट मिळू द्यायचं नाही हे पद्मसिंह पाटील आणि रविंद्र गायकवाड या दोघांनी ठरवलं. ओमराजेचा राजकीय अस्त करण्याचा डाव पद्मसिंह पाटील यांनी आखला. त्यांना साथ दिली कट्टर शिवसैनिक रविंद्र गायकवाड यांनी.
रविंद्र गायकवाड समर्थकांनी शिवसेना नेत्यांकडे 'नियोजित' चकरा सुरू केल्या. गायकवाडांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली ताकद दाखवण्यास सुरूवात केली. आदळआपट करून का होईना खासदारकीचं तिकीट पदरात पाडून घेण्यात यश आलं. ओमराजेंना वडीलांच्या हत्येचा सूड हा पद्मसिंह पाटील यांचा पराभव करून उगवायचा होता परंतू त्यात रवी गायकवाड आडवे आले. (राष्ट्रवादीनं आडवं आणलं.)
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत रविंद्र गायकवाडांनी गुडघे टेकवले होते. प्रचारात जोर नव्हता. रवी सरांनी घराबाहेर पडण्याचे कष्ट सुद्धा घेतले नाही. तरीही रवी सर निवडून आले. ते निवडून येण्याची दोन कारणं होती, एक तर मोदी लाट आणि दुसरं म्हणजे ओमराजे निंबाळकर यांनी पद्मसिंहांना पाडण्यासाठी गावोगाव केलेली पायपीट. सन्माननीय रविंद्र गायकवाड खासदार झाले परंतू उस्मानाबादच्या समस्या सुटल्या नाही. उलट आणखीनच चिघळत गेल्या. शेतक-यांनी तर 'खासदार दाखवा...' अशा प्रकारचे बॅनर रवी सरांच्याच मतदारसंघात लावले होते. रविंद्र गायकवाड हा उस्मानाबादकरांवर लादलेला खासदार आहे, हे शिवसेना नेतृत्वाला कधी कळणार ?
मतदारसंघात सर 'नापास'
जिल्हा परिषद निवडणूकीत उस्मानाबाद जिल्हातील पुनाळी मतदारसंघातून रविंद्र गायकवाड यांचे पूत्र किरण गायकवाड यांचा पराभव झाला. मुलाला विजयी करण्यासाठी रविंद्र गायकवाड यांनी अनेक प्रयत्न केले. परंतू शक्य झालं नाही. तर दुसरा धक्का बसला तो जिल्हा परिषदेची सत्ता शिवसेनेच्या हातातून गेली. शिवसेनेचे दोन जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीकडे गेले. तर मित्रपक्ष असलेल्या भाजपनं ऐनवेळी दगा देत राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद सगळी सत्ताकेंद्र हातातून निसटली. भूम, परंडा, कळंब राष्ट्रवादीकडे आणि तुळजापूर काँग्रेसकडे. उस्मानाबादमध्ये केवळ नंदू राजे हे शिवसेनेचे नगराध्यक्ष आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेचं पानीपत झालं. सेना आता केवळ नाममात्र उरली आहे. आपल्याच मतदारसंघात रवी सर नापास झाले. त्याचं शल्य मनात होतं. विशेष म्हणजे भाजपनं केलेला दगा सरांच्या डोक्यात चांगलाच बसला होता. त्यामुळे एअर इंडीयाच्या अधिका-यानं मोदीचं नाव घेतल्यावर ‘’मैं बीजेपी का नहीं. शिवसेना का एमपी हूं.’’ अशी गर्जना करत रवी सरांनी भाजपसोबतचा हिशोब चुकता केला. हा म्हणजे, वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रकार झाला.
गायकवाडांना अटक होणार का...?
दोन दिवस एअर इंडिया आणि रविंद्र गायकवाड यांचा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालू राहीला. त्याचं रूपांतर आता एफआरआय मधून झालं. एअर इंडियाने रविंद्र गायकवाड यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. IPC 353 (Assault or Criminal force to deter public servant from discharge of this duty) लावण्यात आला आहे. हा जामीनपात्र गुन्हा असला तरी, रविंद्र गायकवाड यांना अटक करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. दिल्ली पोलिसांच्या दोन टीम मुंबई आणि उस्मानाबादच्या दिशेनं रवाना झाल्या आहेत. ज्या वेगात घडामोडीं घडत आहेत, त्यावरून रविंद्र गायकवाड यांना अटक करण्यात येईल, असं दिसतंय. या प्रकरणामुळे रविंद्र गायकवाड त्यांचा मतदारसंघ उस्मानाबादमध्ये हिरो झाले. कट्टर शिवसैनिक आणि मारहाणीचं लेबल यामुळे गायकवाडांची प्रतिमा आणखी उजळली आहे.
हक्कभंग होतो का...?
सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे आणि गायकवाड हे खासदार आहेत. कोणताही गुन्हा नोंदविण्यासाठी लोकसभेच्या अध्यक्षांच्या परवानगीची आवश्यकता नसते. मात्र, खासदारांना अटक केल्यानंतर २४ तासात लोकसभा अध्यक्षांना कळवण्याचे बंधन पोलिसांवर आहे. यापूर्वी वायएसआरसी पार्टीचे खासदार मिथून रेड्डी यांनी एअर इंडियाच्या कर्मचा-यांना मारहाण केली होती. त्यावेळी आंध्र पोलिसांनी त्यांना अटक केली. अटकेच्या २४ तासानंतर लोकसभा अध्यक्षांना कळवण्यात आले. ही हाणामारी संसद परिसराच्या बाहेर झाली असल्यामुळे लोकसभा अध्यक्ष हस्तक्षेप करू शकत नाहीत. मात्र, संसद परिसरात घटना घडली असती तर सुमित्रा महाजन यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले असते. रवी गायकवाड यांनी लोकसभा अध्यक्षांना घडलेल्या घटनेबद्दल पत्र लिहिले. या पत्रात एअर इंडियाच्या अधिका-याला मारहाण केल्याचा उल्लेख आहे परंतू खासदाराच्या हक्कांचा भंग झाला किंवा खासदाराला शिवीगाळ, मारहाण झाल्याचा कुठेही उल्लेख नाही. शिवाय एअर इंडियाच्या विमानात टिव्ही, टावेल, टिश्यू पेपर नसतो, अशी तक्रार केली आहे. त्यावर, ही तक्रार तुम्ही एविएशन मिनिस्टरकडे करा, असं लोकसभा अध्यक्षांनी खासदारांना कळवलं. या पत्रातून रवी गायकवाड यांच्यावर अन्याय झाल्याचं दिसून येत नाही उलट ते स्वतः दोषी असल्याचं सिद्ध होते.
मारहाण केल्याचा व्हिडीओ आणि स्वतः गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीतून त्यांचीच बाजू कमकुवत झाली आहे. मात्र, विमान कंपन्यांनी झुंडशाही दाखवत प्रवासावर बंदी घालणं, हा हक्कभंग होऊ शकतो. त्यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांकडे खासदार रवी गायकवाडांना दाद मागता येऊ शकते. हक्कभंगाचा प्रस्ताव एक दिवसापूर्वी द्यावा लागतो. त्यानंतर हा प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठविला जातो.
तर गोडसेचा भगवंत मान झाला असता...
दुसरे प्रकरण नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्याचे. हेमंत गोडसे यांचा कार्यकर्ता गोरख खर्जुल यानं एमआयएमचे खासदार औवेसी यांना कानशिलात मारल्याची घटना संसदेच्या आवारात घडली. गोरख हा हेमंत गोडसे यांचा कार्यकर्तां. गोडसे यांच्या पत्रावरच तो संसद पाहण्यासाठी आला होता. संसदेच्या पार्किंगमध्ये औवेसी दिसल्यावर त्याला रहावलं नाही. हिंदू विरोधात वक्तव्य का करतो, अशी विचारणा केल्यावर, "तू कोण है, चल भाग यहां से.." असं उत्तर औवेसी कडून मिळालं. त्यामुळे संतापलेल्या गोरखंनं औवेसीच्या कानशिलात लगावली आणि तो बाहेर पडला. संसदेच्या सुरक्षा रक्षकांनी खरंच असं घडलं आहे का, याबद्दल फुटेज पाहिले असता मारहाणीचा कोणताच प्रकार नसल्याचे दिसून आले. मग गोडसेंच्या कार्यकर्त्यांनी केवळ प्रसिद्धी झोतात येण्यासाठी केलेलं हे कृत्य होतं का, असा प्रश्न निर्माण होतो. या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या घटनेची माहिती मागितली. हा प्रकार कळाल्यानंतर त्यांना संताप आला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर काही वेळातच लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातून मला फोन आला. त्यांनी उद्धव ठाकरे दिल्लीत येणार आहेत, याबद्दल विचारणा केली. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना उद्धव ठाकरेंना भेटून शिवसेना खासदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या वर्तणुकीबद्दल बोलायचं होतं. ही घटना सुमित्रा महाजन यांनी गांभीर्यानं घेतली. काही दिवसांपूर्वीच भगवंत मान यांनी दारू पिऊन संसदेच्या आवारात गाडी चालविली. सुरक्षा व्यवस्थांना जुमानले नसल्यामुळे भगवंत मान यांना दोषी ठरवून निलंबन करण्यात आलं. त्यामुळे संसदेतील आम आदमी पार्टीचा आवाज बंद झाला. हेमंत गोडसे यांच्या बाबतीत सुमित्रा महाजन यांनी कडक पावित्रा घेतला असता तर त्यांचासुद्धा भगवंत मान झाला असता.
बाळासाहेब असते तर...
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर या दोन्ही घटना सहजपणे हाताळल्या असत्या. बाळासाहेब ठाकरे तर एअर इंडियाची आणि ओवेसीचीच शाळा घेतली असती. कदाचित रविंद्र गायकवाड यांचा मातोश्रीवर सत्कारसुद्धा झाला असता. शिवसेना खासदारांवर चहुबाजूंनी टिका होत असताना शिवसेनेकडून गायकवाडांच्या बाजूने ठामपणे उभे असल्याचे कोणीच दिसलं नाही. रविंद्र गायकवाड यांच्या पाठीशी उभं राहायचं की नाही हे शिवसेना खासदारांना कळत नव्हतं. काहींना तर घटनाच माहित नव्हती. ज्यांना माहित आहे, त्यांना बोलायचं सुचत नव्हतं. नव्यानं निवडून आलेल्या खासदारांचा अपरिपक्वपणा दिसून येत होता. संसदेतील कामाचा अनुभव असलेले खासदारही बिथरल्यासारखे वागत होते. शांतपणे प्रकरण हाताळणा-या नेत्यांची उणीव जाणवत होती. या प्रकरणावरून शिवसेना अजूनही संभ्रमावस्थेत आहे. हा संभ्रम शिवसेनेच्या खासदारांमध्ये आणि नेतृत्वातसुद्धा दिसून आला.