मुंबई : (विनोद  पाटील, झी २४ तास ) ‘दंगल’ म्हणजे कुस्ती आणि ही कुस्ती पहिलवानांबरोबरच व्यवस्था, मानसिकता, परंपरा आणि समाजाच्या आखाड्यातही रंगली आहे. कारण विषय महिला पहिलवानांचा आहे. वास्तव आयुष्यात हा सर्व प्रकारचा संघर्ष हरियाणातील महावीरसिंह फोगट यांनी केला आहे. मात्र आमीर खाननं तो इतक्या प्रभावी आणि चपखलपणे पडद्यावर साकारला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाचवेळी कठीण आणि नाजूक असलेल्या या विषयाला दुसरा कुठलाही कलाकार योग्य न्याय देऊ शकला नसता. कारण त्याला पार्श्वभूमीही तशी आहे. आमीर पहिल्यांदाच व्यवस्थेशी अशी कुस्ती खेळत नाही आहे. ‘दंगल’च्याही आधी आमीर खान आपल्या देशातल्या शिक्षण व्यवस्थेविरोधात कुस्ती खेळला आहे. 


‘तारे जमीन पर’मधून शिक्षकाच्या भूमिकेतून त्याने शालेय शिक्षण पद्धत आणि पालकांच्या मानसिकतेशी दोन हात केले. तर ‘३-इडियट्स’मध्ये  केवळ मार्कांच्या मागे धावणाऱ्या जीवघेण्या कॉलेज शिक्षण पद्धतीच्या आखाड्यात विद्यार्थ्याच्या भूमिकेतून तो कुस्ती खेळला. 


आता ‘दंगल’च्या माध्यमातून त्याने एका ध्येयवेड्या पहिलवान पित्याची भूमिका साकारून पुरूषांची मक्तेदारी असलेल्या कुस्तीच्या क्षेत्रातील बुरसटलेल्या परंपरेला चारीमुंड्या चीत केले आहे. आमीरचा सिनेमा केवळ सामाजिक संदेशच देत नाही तर तो पैसा वसूल मनोरंजनही तेवढ्याच ताकदीने करतो, आणि ही परंपरा त्यांने ‘दंगल’मध्येही कायम ठेवली आहे. 


‘दंगल’मध्ये सारे काही आहे. कॉमेडी, इमोशन्स, अॅक्शन, फॅमिली ड्रामा, धडाकेबाज म्युझिक, आणि सध्या देशभक्तीच्या वाहत असलेल्या वाऱ्याची झुळूकही सिनेमातून वाहते. त्यामुळे अस्सल एन्टरटेन्मेंट सिनेमा असला तरी तो सर्वार्थाने वेगळा भासतो. कारण आमीरसह सर्वांनी आपापल्या भूमिकांना २०० टक्के न्याय दिला आहे. 


आमीरचे कान सोडले तर कधीही न पाहिलेला आणि न अनुभवलेला आमीर खान तुम्हाला या सिनेमात पाहायला मिळतो. आमीरचा हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स आहे. विशीतला नॅशनल चॅम्पियनशिप खेळणाऱ्या पहिलवानापासून ते थोडासा थकलेला पण जिद्द न हरलेला कठोर आणि शिस्तप्रिय पन्नाशीतला ३ मुलींच्या बापापर्यंतचा प्रवास आमीरने अफलातून साकारला आहे. 


केवळ शारिरिक बदल करणे म्हणजे अभिनय नव्हे, तर ती वागण्या, बोलण्यासह त्या भूमिकेचा एटिट्युड जगणे म्हणजे अभिनय, हे आमीरने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे ऐन भरात असताना महावीरला (आमीरला) कुस्ती सोडावी लागते. मात्र कुस्ती त्याला काही सोडत नाही. त्यामुळे त्याची पहिलवानी अधूनमधून प्रत्यक्षात डोकावत तर असतेच परंतू गावच्या आखाड्यातही तो न चुकता पुढच्या पीढीला प्रोत्साहित करण्यासाठी जात असतो. लग्नानंतर मात्र त्याच्या देशासाठी गोल्ड मेडल आणण्याच्या स्वप्नपूर्तीला दिशा मिळते. कारण होणाऱ्या मुलाकडून तो ध्येयपूर्तीची आशा बाळगतो. मात्र त्याच्या पदरात मुलगी पडते. 


दुसऱ्यांदा तरी मुलगा व्हावा, यासाठी गावातल्या बुजुर्गांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी सूचवलेल्या क्लृप्त्या आणि महावीरने त्यासाठी केलेली कसरत, म्हणजे विनोद-करूणेचा अफलातून संगम साधला आहे. मात्र पुन्हा मुलगीच जन्माला येते. त्यात खाप पंचायतीच्या जोखडात अडकलेला बुरसटलेल्या विचारांचा समाज. त्यामुळे भविष्यातले स्वप्न रंगवणाऱ्या भिंतीवर टांगलेल्या भूतकाळातील विजयाच्या खुणा ट्रंकेत ठेवण्याची वेळ महावीरवर येते. 


इच्छाशक्ती तीव्र असली तर नियतीचा तराजू तुमच्या बाजुला झुकतो. महावीरच्या मुलींच्या आयुष्यात असाच एक प्रसंग घडतो, आणि त्याचे ट्रंकेत गुंडाळून ठेवलेले स्वप्न पुन्हा बाहेर येऊन बहरू लागते. महावीर मुलींना पहिलवान बनवण्याचा निर्धार करतो. संपूर्ण गाव त्याला वेड्यात काढते. 


एवढेच नव्हे तर गुरू म्हणून त्याच्या कठोर वागणुकीला त्याच्या मुलीही कंटाळतात. मात्र या निष्ठूर गुरूतला एक भावूक बापही आमीरने मोठ्या ताकदीने वठवलाय. साक्षी तन्वरने आईच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. छोट्या आणि मोठ्या चारही गीता-बबितांनी पहिल्याच सिनेमात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. फातिमा शेखचा (मोठी गीता) तर प्रत्येक विजयानंतरचा आपल्या वडलांकडे पाहून दाखवलेला पहिलवानी एटिट्युड नजरेत भरण्यासारखा आहे. 


गिरीष कुलकर्णीने कोचच्या भूमिकेत ‘अग्ली’नंतर पुन्हा एकदा हिंदी सिनेमात दमदार अभियनाची मेजवानी प्रेक्षकांना दिली आहे. चित्रपटाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे दिग्दर्शक. नितेश तिवारी हे काही प्रस्थापित दिग्दर्शकाचे नाव नाही. चिल्लर पार्टी आणि भूतनाथ रिटर्न या दोन सिनेमांचे नितेशने दिग्दर्शन केले आहे. 


दोघेही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकलेले नसले, तरी चिल्लर पार्टीत नितेशच्या वेगळेपणाची चुणूक आधीच दिसली होती. मात्र दंगलमुळे नितेशच्या दिग्दर्शनाच्या कक्षा फारच रुंदावल्या असून, त्याने आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये स्थान मिळवले आहे. आमीरने नेहमीप्रमाणे यंदाही ख्रिसमसच्या निमित्ताने प्रेक्षकांना खास करून मुलींना आणि त्यांच्या पालकांना प्रेरणादायी  गिफ्ट दिले आहे.