रामराजे शिंदे, झी मीडीया, नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२६ वी जयंती आपण साजरी करत आहोत. बाबासाहेबांनी जातीप्रथा नष्ट करण्यासाठी आवाज उठवला पण हा संघर्ष अद्याप संपला नाही. बाबासाहेबांची जयंती साजरं करणं म्हणजे ख-या अर्थानं त्यांच्या विचारांना प्रत्यक्षात उतरवणं. गिन्नी माही नेमकं हेच करते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहानवयातच बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेली १९ वर्षीय गिन्नी माही आपल्या गाण्यातून बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे. यापूर्वीही बाबासाहेब आंबेडकरांवर अनेक गीते लिहली गेली परंतू गिन्नीचं वेगळेपण यासाठी की आजच्या युगाला साजेशा भाषेत आणि बाजात तिची ही गाणी आहेत. केवळ बाबासाहेब आंबेडकरांचीच गाणी गाणा-या या पंजाबमधील पॉप सिंगर विषयी सांगताहेत... ‘झी २४ तास’चे दिल्ली प्रतिनिधी रामराजे शिंदे.


पंजाब निवडणूकीच्या कव्हरेजसाठी निघालो होतो  त्यावेळी माझ्या एका मित्रानं सांगितलं की, पंजाबला जात आहेस, तर पॉप सिंगर गिन्नी माहीला नक्की भेट. तिने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर खूप चांगली पॉप गाणी गायली आहेत. 


काय..? पॉप गाणी, तीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर.? माझी पहिली प्रतिक्रीया ही अशी होती. मराठी मातीतले संस्कार असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पॉप गीतं गायली जाताहेत,, हे पचायलाच सुरूवातीला जड गेलं.


पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर पॉप गाणी म्हणून उत्सुकताही वाटली. ‘कोण ही गिन्नी माही?’ म्हणून मी गुगलवर सर्च करणार तेवढ्यात आठवलं की एका मुलीचे पॉप गाण्यांचे व्हिडीओ युट्यूबवर धुमाकूळ घालत आहेत. परंतू तिच ही गिन्नी माही हे तोपर्यंत माहीत नव्हतं. 



आंबेडकरांच्या कार्यासाठी 'आवाज'अर्पण


गिन्नीला भेटण्यासाठी जालंधरमध्ये पोहोचलो. प्रवेश करतानाच एका चौकात गिन्नी माहीचे पोस्टर दिसले. पंजाबी कुर्ता सलवार पोशाखात ढोल वाजवत गाणं गातानाचे मोठे पोस्टर लावण्यात आले होते. तिथं पोहोचल्यानंतर अनेकांकडून तिचं नाव ऐकायला मिळालं. वयाच्या अकाराव्या वर्षापासून गिन्नी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिली गेलेली गाणी गात असल्याचं तिथल्या लोकांनी सांगितलं. त्यामुळे तिच्याविषयीची उत्सुकता अधिकच ताणली. तिची मुलाखत घेण्याचं ठरवलं. पण तिचा फोन नंबर मिळवणं थोडंसं अवघडच गेलं. अखेर फेसबुकवरून तिचे वडिल राकेशजी यांचा नंबर मिळविला आणि त्यांना फोन केला. ४ फेब्रुवारी २०१७ रोजी संध्याकाळी भेटण्याचं ठरलं. जालंधर शहरातील दलित वस्तीत गिन्नी आणि तिचे कुटुंबीय राहतात. गल्ल्या पार करत शेवटी तिच्या घरापर्यंत पोहोचलो. गिन्नीच्या घरासमोरच गुरूद्वार आणि मशिद आहे. विशेष म्हणजे गुरूद्वार आणि मशिदीची भिंत एकच आहे. क्षणभर घराबाहेर थांबल्यानंतर आत घरात गेलो. पाहतो तर काय, भिंतीवर फक्त पुरस्कारच लटकविलेले! आणि त्या पुरस्कारांच्या मधोमध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो. आत गेलो तेव्हा गिन्नी घरात नव्हती. तिच्या वडिलांनी सांगितलं, गिन्नी कॉलेजला गेली आहे. थोड्याच वेळात येईल. मग तिच्याविषयी तिच्या वडिलांसोबत गप्पा सुरू झाल्या.


तेव्हा कळालं गिन्नी माही हे तिचं खरं नाव नाही. तिचं खरं नाव, गुरूकवंल भारती. १९ वर्षीय गिन्नीचा जन्म पंजाबमधील जालंधरमध्ये एका अतिशय साधारण कुटुंबात झाला. लहानपणापासूनच गाण्याची आवड  असल्याने गिन्नीने गाण्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरूवात केली. तिच्या वडिलांनीही तिला प्रोत्साहन दिलं. गिन्नीने लहानपणापासूनच कोणत्या बाजातली गाणी तिनं गायला हवी, याचं स्वातंत्र्यही तिच्या वडिलांनी तिला दिलं. 


राकेशजी आणि मी गप्पांमध्ये गुंतलो होतो, तेवढ्यात पाठीवर कॉलेजची बॅग लावलेली गिन्नी आली. पॉप गाणी गाणारी हीच ती मुलगी का, असा प्रश्न पडला. कॉलेज संपवून घरात प्रवेश केल्यानंतर गिन्नी घरातील शाळेत प्रवेश करते. तिथे तिचे आई वडील तिचे शिक्षक असतात आणि पाठ असतो डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे जीवनकार्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी अधिकाधिक जाणून घेण्यासाठी गिन्नीला सातत्याने तिचे वडील राकेश माही मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे लहान वयातच गिन्नीने आंबेडकरांविषयी बरंच ज्ञान मिळविलं. बाबासाहेबांविषयीचं गिन्नीचं हे ज्ञान तिच्या गोड गळ्यातून गाणं होऊन बाहेर पडतं तेव्हा त्यातील ऊर्जा आणि गिन्नीच्या व्यक्तिमत्त्वाचा हेवा वाटायला लागलोत. आपसूकच बाबासाहेबांचं कार्य डोळ्यासमोर येतं. लहान वयातचंमिळालेली आंबेडकरी विचारांची प्रेरणा, घरातून मिळालेली शिकवण आणि सामाजिक परिस्थिती यामुळे गिन्नीने केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित गाणी गाण्याचाच विचार पक्का केला. गिन्नीशी बोलताना तिला विचारलं की,तू आंबेडकरांवरच गाणी का गाते?त्यावर, ‘आंबेडकरांनी स्वतःचं आयुष्य समाजासाठी अर्पण केलं म्हणून मी माझा आवाज आंबेडकरांच्या कार्यासाठी अर्पण केला’ इतकं सहज उत्तर गिन्नी देते. तिच्या वयाच्या मानाने तिचं कर्तृत्व खूप मोठं आहे. 


‘गिन्नी माही’ हे नाव युट्यूब किंवा गुगलवर सर्च केलं तरी तिची अनेक गाणी समोर येतात. 'फॅन बाबा साहब दी', 'डेंजर चमार...' अशी गिन्नीच्या पॉप अल्बम्सची नावं आहेत. त्यातील गाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित असली तरी ती पॉप गीतं आहेत. खरंतर पॉप संगीत म्हटलं की, मॉर्डन, आजचं, थिरकायला लावणारं असं संगीत डोळ्यासमोर येतं. अर्थातच गिन्नीची गाणीही थिरकायला लावतात, पण तिच्या या थिरकायला लावणाऱ्या गाण्यांमध्ये कुठेही बेधुंदपणाचा लवलेशही नाही. उलट एक ऊर्जा, सामाजिक परिवर्तनाची एक मोठी लाटच गिन्नीच्या पॉप गीतांनी निर्माण केली असल्याचं चित्र दिसून येत आहे.


'डेंजर चमार' म्हणजे काय?


सध्या गिन्नीचं ‘डेंजर चमार’ हे गाणं खूप गाजतंय. त्याविषयी गिन्नी विचारलं, चमार(चांभार) समाजावर गाणं म्हणण्याचा उद्देश काय होता?त्यावर ती म्हणाली, ‘जनावरांच्या कातडीपासून चपला बनविण्याचा या समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. आता चित्र बदलतंय. त्यामुळे त्यापलीकडे जाऊन चांभार समाज मोठा व्हावा, समाजातील काही गृहितकं बदलावीत यासाठी माझा प्रयत्न आहे. ‘चमार’ म्हणजे फक्त एक समाज नव्हे तर 'चमडी,  मांस आणि रक्त', ही या शब्दाची खरी व्याख्या. ती मला लोकांना पोहोचवायची आहे. कारण, या तीन गोष्टींपासूनच माणूस बनला आहे. तरीही माणसा-माणसांत भेदभाव का केला जातो?  इतर धर्मातील, जातीतील उच्च लोकांना जसा जगण्याचा अधिकार आहे, तसाच आम्हालाही आहे. ‘चमार’ हे  नाव तितक्याच अभिमानाने घेतलं गेलं पाहिजे. या समाजाला प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या कामाला  बाबासाहेबांनी सुरूवात केली. पण इतक्या वर्षांनंतरही समाजाविषयीच्या गैरसमजुती अजूनही दिसतात. त्या दूर करण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत.’ गिन्नीचे हे शब्द समाजाप्रती तिच्या मनातली अस्वस्थता दर्शवत होते. 


‘चमार’ शब्दामागचा गहन अर्थ त्या मुलीने सहज समजावला, पण त्याआधीच्या ‘डेंजर’ शब्दामागचं कोडं मनात तसंच होतं. म्हणून पुन्हा गिन्नी विचारलं, ‘डेंजर चमार’ हे नाव थोडं ‘डेंजर’ वाटत नाही का..?  त्यावर ती हसत म्हणाली, ‘मला कॉलेजमध्ये एका मैत्रिणीने विचारलं होतं की, तू कोणत्या समाजाची आहेस. मी म्हटलं, संत रोहिदास समाजाची! मैत्रिणीनं पुन्हा विचारलं, रोहीदास समाज म्हणजे कोणता समाज? मी म्हटलं, चमार. हे ऐकल्याबरोबर माझी मैत्रीण म्हणाली, ‘चमार तो बहोत डेंजर होते है।.’ मी विचारलं, असं का?,  डेंजर क्यों होते है?, तर मैत्रीण म्हणाली, चमार लोकांनी एकदा का कुठली गोष्ट ठरविली तर ते पूर्ण करतातच. ते लोक मारहाण करण्यासही मग घाबरत नाहीत. पुढे काय होणार आहे, याची त्यांना पर्वा नसते. मैत्रिणीच्या त्या उत्तरावरच ‘डेंजर’या शब्दावर गाणं लिहिण्याची कल्पना मला सुचली.’



गिन्नीच्या ‘डेंजर चमार’ या गाण्यातील ओळी आहेत...



कुर्बानी देनो डरदे नही, रेंहदें है तैयार,


हैगे असले तो वड डेंजर चमार !


‘जीव द्यायलाही घाबरत नाही, सदैव असतो तयार. आम्ही आहोत खरे डेंजर चमार!’… असा या ओळींचा अर्थ. 


गिन्नी केवळ गाण्यातच नाही, तर अभ्यासतही हुशार आहे. तिला नुकत्याच झालेल्या परिक्षेत ७८ टक्क्याहून अधिक गुण मिळाले. गायनाचा सराव करताना अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं जात नाही. परंतू केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर आधारितच गाणी गाणं, ही सोपी गोष्ट नाही. कारण बाबासाहेबांचीच गाणी का म्हणते, म्हणून गिन्नीला अनेक धमक्याही आल्या. शिवीगाळ करण्यात आली. तिच्या कुटुंबीयांनाही हा त्रास सहन करावा लागतो. गिन्नी सांगते, ‘पण मी धमक्यांना घाबरत नाही. कारण, मी चुकीचं काहीच करत नाही. बाबासाहेबांनीच हक्कासाठी लढण्याची शिकवण दिली आहे. जसे धमक्यांचे फोन येतात, तेस अनेकदा अभिनंदनाचे फोनही येत असतातत. त्यामुळे प्रोत्साहन मिळतं.’



गिन्नीचा आत्मविश्वास आता वाढला आहे. हक्कासाठी लढण्याचा संदेश गिन्नीने आपल्या गाण्यातूनही दिला आहे.


उतरू कितना उपकार जी


ओ संविधान जो पढ दी भारत सरकार जी..


डर के चुप ना रहना


डर के चुप ना रहना..


ऐसा जोश जगा गए यार


हक्का दी लढना बाबा साहब सिखा गए यार 


 गिन्नीच्या गाण्यांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पगडा दिसतो. बाबासाहेब यांनी संविधान तयार करून सर्वांनाच जगण्याचा अधिकार दिला आणि आपल्या हक्कासाठी लढण्याची शिकवणही दिली. मात्र समाजातील उतरंड अजूनही संपली नसल्याचं गिन्नी सांगते. ती संपवण्यासाठीच गिन्नी प्रयत्न करतेय. बाबासाहेबांनी दिलेला एकता, मानवतेचा संदेश गाण्याच्या माध्यमातून घराघरात पोहोचविण्याचा तिचा मानस आहे. गिन्नीचे पंजाबी भाषेत खूप पॉप अल्बम आले. तिने हिंदीतही काही अल्बम आणले. त्यापैकी एक म्हणजे.. प्रणाम मेरा. बाबासाहेबांनी जातीवाद समूळ नष्ट करण्यासाठी काय कष्ट घेतले, याचं वर्णन या गाण्यात आहे. 


या गाण्याच्या ओळी अशा आहेत.. 


चारों और अंधेरा था, जब इस संसार में छाया


रोशन की तब एक किरण ने दुनिया को रोशनाया


पाप जुलम का आपने ऐसा नाश किया


जड से जातीवाद वृक्ष उखाड दिया


मानवता पे तुमने जो उपकार किए


पुरी दुनिका के श्रम निखार दिए..


बाबा साहब जी तुमको है प्रणाम मेरा.. प्रणाम मेरा. 


वो बन के मसिहा आया था


जब जुल्म का बादल छाया था


कर कलम से ऐसा वार गया


दुखियों के कष्ट निवार गया.. 


 


गाते पॉप गाणी तरीही वेगळी!


आंबेडकरांनी केलेलं कार्य शब्दात उतरविण्याचं आणि ते शब्द पुन्हा संगीतबद्ध करून गाण्यातून लोकांसमोर मांडण्याचं काम गिन्नी करतेय. तिच्या वयातील मुला-मुलींमध्ये आकर्षण आणि अनुकरण पाहायला मिळतं, ते पाश्चिमात्य संस्कृतीचं! त्यात गिन्नी गाते पॉप गाणी. पॉप सिंगर म्हणून पंजाबमध्ये आणि सोशल मीडियावरही ती लोकप्रिय आहे.  पॉप सिंगर्स म्हटलं की, डोळ्यासमोर येतात त्या कमी-तोकड्या कपड्यातल्या मुली. पण गिन्नीचा पेहराव पूर्णतः वेगळा आहे. तोकडे कपडे घालण्याची परंपरा असलेल्या पाश्चिमात्य संगीतात तू वेगळी कशामुळे आहेस..., असं विचारल्या वर गिन्नी म्हणते, प्रथमतः तर गाण्याशी कपड्यांचा काही संबंध नाही. आणि केवळ तोकडे कपडे घालण्यात सौंदर्य नसतं. मी माझ्या अल्बम्समध्ये निळ्या रंगाचे कपडे घातलेले दिसतील. हा रंग बाबासाहेबांना आवडत होता. निळ्या रंगातील पूर्ण कपड्यातचं मला मी सुंदर वाटते आणि मनापासून निघालेला आवाज लोकांना आवडतो.. ते ऐकतात. मग, लोकांना चांगलं ऐकवण्यासाठी कपडे उतरवण्याची काय गरज?  


बाबासाहेबांचे विचार स्वस्थ बसू देत नाहीत...


गिन्नीचे वडील राकेशजी नोकरी करत होते. परंतू त्यांनी नोकरी सोडून आपल्या मुलीला गाण्यात मदत करायला सुरूवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कार्य राकेशजींना तोंडपाठ आहेत. ते म्हणतात, ''बाबासाहेबांनी शिकविलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. बाबासाहेबांचं स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही. दलित, आदिवासी अद्याप शिक्षित झालेले नाहीत. महिलांनाही कित्येक मुलभूत अधिकारांपासून डावललं जातंय. तरूणाई भरकटत चालली आहे. या सर्व विषयांवर काम करायचं आहे. लोकांमध्ये जनजागृती आणायची आहे. जोपर्यंत हे स्वप्न पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. बाबासाहेबांचे विचार मला स्वस्थ बसू देत नाहीत.''


काशीरामला नाकारले, गिन्नी माहीला स्विकारले


पंजाबच्या विधानसभा निवडणुकी दरम्यान तिथे जाणं झालं तेव्हा जाणवलं की, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे अनेक समाजसुधारक लाभले. परंतू पंजाबला असे महान सुधारक लाभले नाहीत. निवडणुकीमुळे पंजाबमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. अशावेळी पंजाबवर कोणत्या विचारांचा पगडा आहे, हे शोधण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी एक नाव सापडलं, ते म्हणजे काशीराम यांचं. पंजाबमधील रूपनगर येथे काशीराम यांचा जन्म झाला.  स्वतःला दलित आणि अस्पृश्य समाजासाठी वाहून घेतलेले आणि दलित समाजाचे नेतृत्व करणारे काशीराम यांनी जालंधरमध्ये आपला बहुजन समाजवादी पक्ष वाढविण्याचा प्रयत्न केला. भारतातील सर्वाधिक म्हणजे ३२ टक्के दलित समाज पंजाबमध्येच आहे. जालंधरमध्ये काशीराम यांनी आपली ‘वोट बँक’तयार केली. दलित वस्तीत बसपचा हत्ती पोहचविण्यात त्यांना यश आलं मात्र संपूर्ण  पंजाबमध्ये ते बसपचा हत्ती पोहचू शकले नाहीत. राजकीयदृष्ट्या ते पंजाबमध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत. याउलट बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात त्यांना चांगले यश मिळाले.. त्यानंतर काशीराम यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारची वाट धरली. तिथे त्यांच्या हत्तीला चांगलं बळ मिळालं. काशीरामांनंतर मायावती यांनी बसप ताब्यात घेतली आणि त्या काशीराम यांच्या वारसदार झाल्या. 


आता गिन्नी माहीच्या पॉप गाण्यामुळे दलित समाज पंजाबमध्ये पुन्हा एकत्र येत आहे. आपल्या गाण्यातून दलित समाजाला सन्मानानं जगण्याचा अधिकार देण्यासाठी गिन्नीची धडपड सुरू आहे. तिच्या युट्यूब वरील गाण्यांना लाखो हिट्स आणि लाइक्स मिळत आहेत. गिन्नीची दखल आता विदेशातील बुद्धीजीवी लोकही घेत आहेत. दलितांची ती आयकॉन बनली आहे. गाण्यातील सूर तिच्याकडे आहेत, आता राजकारणातही नस तिला सापडत आहे. दलित मुलगी म्हणून गिन्नी माही प्रसिद्ध आहे. मायावतीनंतर आता दलित समाजात प्राण ओतण्याचे काम गिन्नी माही करत आहे. त्यामुळे गिन्नी राजकारणात उतरली तरी तिचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असणार आहे. लोकांचे मन वळविण्याचे कामही गिन्नीच्या गाण्यातून होत आहे. 


मतभेद विसरून तिच्या आवाजासाठी दलित लोक संघटित होत आहेत. जातीप्रथा नष्ट करण्याचा तिचा संघर्ष अजून सुरूच आहे.


  ''शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.'' या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्याला अर्थ देण्याचं काम गिन्नी खऱ्या अर्थाने करतेय.