पोलिसातील माणुसही जरा जाणून घ्या...
बुधवारी दिनांक १२ एप्रिलला सकाळी मी डोंबिवलीत शहीद अरूण चित्ते पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेलो होतो. पेट्रोलपंपाच्या अगदी दाराशी एक कचरा वेचणारा माणूस पडला होता.
डोंबिवली : (अमित भिडे) ही सत्य घटना आहे पोलिसातल्या माणसाची. सोपान काकड आणि नारायण भोसले या डोंबिवली मानपाडा पोलिस स्टेशनमधल्या पोलिसांची... बुधवारी दिनांक १२ एप्रिलला सकाळी मी डोंबिवलीत शहीद अरूण चित्ते पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेलो होतो. पेट्रोलपंपाच्या अगदी दाराशी एक कचरा वेचणारा माणूस पडला होता.
काहीही हालचाल नव्हती. उकाडा, उष्णता प्रचंड होती. पेट्रोलपंपाच्या दाराशी असलेल्या हवावाल्याला हा कोण माणूस पडलाय हे विचारलं. पण तो ही केवळ हसला. परिसरातला कोणीही मदत करायला तयार नव्हते. भर दुपारी रस्त्यात एक माणूस पडतो, पण लोक बघ्यासारखे बघत होते. तो जीवंत आहे का, नषेच्या अंमलाखाली आहे का असे प्रश्न पडले होते... हालचाल काहीही नव्हती. मला राहावलं नाही.
मी जवळचं मानपाडा पोलीस स्टेशन गाठून तिथे याची माहिती दिली. तिथल्या पोलिसांनी बिट मार्शल पाठवू असं सांगितलं. म्हणून परत घटनास्थळावर पोहोचलो. माझ्या आधी बाईकवरून दोन पोलीस पोहोचले होते. काकड आणि भोसले हे ते दोन पोलीस होते. त्यांनी त्या माणसाला हलवून पाहीलं. जिवंत होतं.
लगेच पोलिसांनी हवावाल्याकडून पाणी आणलं त्याच्या अंगावर डोक्यावर पाणी ओतून त्याला जागा केला. त्याला पाणी पाजलं. वर त्याला स्वतःच्या खर्चाने वडापावही खायला घातला. तो कोण कुठे राहतो याची चौकशी केली. पोलिसांसोबत मी उभा होतो. पोलीस उद्वीग्न झाले होते. आजूबाजूचे लोक नुसते गंमत बघत उभे होते.
इथे प्राण्यांवर प्रेम करणारे सापडतील. पण रस्त्यात माणूस जिवंत आहे की मेलाय याची दखल कोणाला घ्यावीशी वाटत नाही. त्या माणसाला जागा करून खायला देऊन पाणी पाजून पोलीस निघून गेले. झी २४ तासवर आम्ही पोलिसांतल्या दुष्प्रवृत्तीवर अनेकदा कोरडे ओढलेत. पण पोलिसांतल्या माणसाचं रूपही जगासमोर यावं हीच इच्छा. काकाडसाहेब आणि भोसले साहेब तुम्हाला सॅल्यूट.