दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदारांनी कुणालाही स्पष्ट बहुमताचा कौल दिला नाही, त्यामुळे मुंबईत सत्ता कोण स्थापन करणार, मुंबईत कुणाचा महापौर होणार याबाबत उत्सुकता आहे. शिवसेना मुंबई पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी भाजपानेही त्या खालोखाल जागा घेतल्या आहेत. शिवसेनेला 86 तर भाजपाला 84 जागा मुंबई महापालिकेत मिळाल्या असून दोन्ही पक्षात केवळ दोनचा फरक आहे. खरेतर शिवसेनेला 100 च्या वर जागा मिळतील अशी अपेक्षा  होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपाबरोबरची 25 वर्षांची युती तोडताना यापुढे युतीसाठी कटोरा घेऊन कुणाच्याही पुढे जाणार नाही अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. मुंबईतील यशाची गणितं लक्षात घेऊनच शिवसेनेने ही गर्जना केली होती. गोरेगावच्या शिवसेना  पदाधिकाऱ्यांच्या पहिल्या मेळाव्यात  युती तोडल्याची आणि स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करताच मुंबईतील शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला होता. कारण शिवसैनिकांनाही मुंबईत भाजपाबरोबर युती नको होती. यामागची भाजपाचे नेते विशेषतः भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि  भाजपा खासदरा किरी सोमय्या ज्या प्रकारे शिवसेनेवर टीका करत होते, त्यामुळे शिवसैनिक प्रचंड दुखावला गेला होता. त्याला वारंवार डिवचण्याचं काम भाजपाचे नेते टीका करून करत  होते. त्यामुळेच भाजपाबरोबर  युती तोडावी आम्ही त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत धडा शिकवू अशी शिवसैनिकांची तीव्र भावना होती. त्यामुळेच मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवताना शिवसैनिक पेटून उठेल आणि शिवसेनेला मुंबईत 100 च्या वर जागा मिळतील असा विश्वास शिवसेना नेत्यांना  होता. मात्र शिवसैनिकांचा जल्लोष, त्यांचे हे पेटून उठणे शिवसेनेला 86 च्या पुढे नेऊ शकले नाही.
 
शिवसेनेने सगळ्यात जास्त लक्ष मुंबई महापालिकेत दिले होते, स्वतः उद्धव ठाकरे यांनी मुंबईत 17 सभा घेतल्या होत्या, तर पुणे, ठाणे, नाशिक आणि पिंपरी-चिंचवड या महापालिकांमध्ये प्रत्येकी एक सभा घेतली होती. तर जिल्हा परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे कुठेच प्रचाराला  गेले नव्हते. 


यावरून मुंबई शिवसेनेसाठी किती महत्त्वाची होती हे लक्षात येते. मात्र एवढे लक्ष घालूनही शिवसेनेला निवडणुकीत अपेक्षित यश आले नाही. शिवसेना क्रमांक एकचा पक्ष झाला याचा आनंद निश्चितच शिवसेना नेत्यांना झाला असणार, मात्र शिवसेनेला 100 च्या  पुढे आकडा गाठता आला नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपाने 84 जागा पटकावल्या याची खंत सर्वात जास्त असणार आहे. 


मुंबईत शिवसेना 86 आणि भाजपा  82 अशी स्थिती असल्यामुळे आता या दोनही पक्षांनी आपला महापौर बनवण्यासाठी कंबर कसली आहे. दोन्ही पक्ष आता अपक्षांच्या आणि इतर पक्षांच्या संपर्कात आहेत. 23 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच भाजपाने अपक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला. यात एक अपक्ष भाजपाच्या गळाला लागला, तर आणखी दोन अपक्षांनी पाठिंबा देण्याचं आश्वासन दिल्याचं भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी जाहीर केले. 


दुसरीकडे शिवसेनेनेही अपक्ष आणि इतर पक्षांच्या मदतीसाठी  प्रयत्न सुरू केले. निवडणुकीत बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या  पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेल्या दोन नगरसेवकांना पक्षात पुन्हा प्रवेश देण्यात आला, तर इतर दोन अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. या सगळ्यात गणितात भाजपा 82 वरून  86 वर तर शिवसेना  84 वरून 88 वर पोहचला. मात्र दोन्ही पक्षात  असलेला हा दोनचा फरक महापौर निवडणुकीत घात ठरू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त नगरसेवकांचा पाठिंबा घेणे  महत्त्वाचे आहे. 


भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि मुंबईत शिवसेनेचाच महापौर बनवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसचा पाठिंबा घेण्याचे प्रयत्नही सुरू केले आहेत. काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. काँग्रेसचे काही नेते याबाबत थांबा आणि वाट पाहा ही भूमिका घेत आहेत, तर काही नेते आम्ही शिवसेनेला पाठिंबा  देणार नाही अशी भूमिका जाहीर करत आहेत. मात्र शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय मुंबईत नव्हे तर दिल्लीत होणार आहे. त्यामुळे दिल्लीतून काय संदेश येतो त्यावर काँग्रेसची भूमिका ठरणार आहे. मात्र महापौर बनवण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू असल्याचे हे द्योतक आहे. 


मागील 20 वर्ष मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपा युतीची सत्ता होती. या कालावधीत महापौर, स्थायी समिती अध्यक्षपद यासह अनेक महत्त्वपूर्ण पदे शिवसेनेच्या ताब्यात होती, त्यामुळे मुंबईतील ही सत्ता  आपल्याकडे खेचण्याचा  भाजपाने प्रयत्न सुरू केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनाही मुंबईतील ही सत्ता आपल्या हातून जाऊ नये म्हणून अटीतटीचा प्रयत्न करताना दिसत आहे.


मुंबईत महापौर पदाच्या या स्पर्धेवर राज्यातील सत्तेची स्थिरताही अवलंबून आहे. राज्यात शिवसेना-भाजपा एकत्र सत्तेत असले तरी सरकारमधील ही युती सध्या तरी नावापुरती आहे. दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेला संघर्ष पाहता सरकारमधील अस्थिरता आजही कायम आहे. तरीही मुंबई महापालिकेत महापौर कुणाचा होतो आणि कसा होतो यावर राज्यातील सरकारची स्थिरता अवलंबून आहे. भाजपाने आपला महापौर करण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेना-भाजपा असा महापौर निवडणुकीत मुकाबला झाला तर शिवसेना दुखावली जाणार हे निश्चित आहे. त्यातच महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली तर शिवसेना भाजपाविरोधात पेटून उठेल आणि यामुळे दुखावलेली शिवसेना कदाचित सत्तेतून बाहेर पडून विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावण्याचा निर्णय घेऊ शकते. 


दुसरीकडे काँग्रेसच्या मदतीने  शिवसेनेने मुंबईत महापौर बनवला तर भाजपा शिवसेनेवर भ्रष्टाचारी काँग्रेसची मदत घेतल्याचा आरोप करून शिवसेनेला आणखी बदनाम  करण्याची संधी सोडणार नाही. आधीच मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून भाजपाने शिवसेनेला या निवडणूक प्रचारात बदनाम केले आहेच, त्यातच काँग्रेसच्या साथीने शिवसेनेचा महापौर झाला तर शिवसेनेला आणखी बदनाम करण्याचे युद्धच जणू भाजपाकडून  छेडले जाईल अशी शक्यता आहे.


दुसरीकडे राज्यातील जालना, औरंगाबाद, हिंगोली, सांगली, कोल्हापूर, नाशिक,  बुलढाणा आणि यवतमाळ या आठ जिल्हा परिषदा आणि काही महापालिकांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला शिवसेनेच्या मदतीची गरज लागणार आहे. शिवसेनेच्या मदतीशिवाय भाजपा इथे सत्ता स्थापन करू शकत नाही. त्यामुळे इतर ठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी मुंबईत भाजपा-शिवसेना एकत्र येणार का याबाबतही उत्सुकता आहे. जर मुंबईत हे दोन पक्ष एकत्र आले नाहीत, तर दुसऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना भाजपला पाठिंबा देणार नाही. त्यामुळे राज्यातील सत्ता, इतर जिल्हा परिषदांमधील सत्ता यांचे भवितव्य हे मुंबईतील महापौर पदाच्या निवडणुकीत  कोण काय भूमिका  घेणार यावर अवलंबून असणार आहे.