परंपरा :पुरुषी अहंकारचं कवचकुंडल


सचिन तायडे, पब्लीक स्पीकर : समाजमान्यतेतून निर्माण झालेल्या कुठल्याही परंपरा एकतर धर्माच्या सावलीखाली मस्त पैकी हातपाय ताणून जीवंत राहतात किंवा त्यांना त्या त्या देशातील पुरुषी अहंकारचं कवचकुंडल प्राप्त होत जात असतं. परवाची नाशिकची कौमार्य तपासण्याची घटनाही या अशाच वृत्तीतून निर्माण झाल्याचं आपण लक्षात घेतलं पाहीजे. या अशा निर्माण झालेल्या किंवा निर्माण करण्यात आलेल्या कोणत्याही परंपरा अधिक करून सरंजामी मानसिकतेतूनच निर्माण होत जाताना दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही सरंजामी मानसिकतेचा वा वागणूकीचा पहीला बळी हा त्या देशातला एकतर सर्वात कमकूवत समाज तरी असतो किंवा त्या देशातली स्त्री तरी असते. आपला देशही याला अपवाद नाही. सती जाण्याच्या सो-कॉल्ड-चारित्र्यवान शिर्षकाखाली जळत्या चितेवर जिवंत महीलेला बांधून जाळण्याचा अमानुषपणा क्वचितच दुस-या कुठल्याशा देशात घडला असेल. त्या आगीचे जीवघेणे चटके जाणवताच चितेवरून उडी मारू पाहणा-या त्या स्त्रीला पुन्हा त्या चितेत ढकलण्यासाठी काही ‘मर्द’ हातात लांब लांब बांबू घेउन उभे रहायचे. काय हा शुरूवीरपणा…


नात्यातली , नको तिथं स्पर्श करणारी गिधाडं


बालपणापासूनच मुलीला किती किती वाईट बाबींना अनुभवत पुढं पुढं सरकत जावं लागतं याची वास्तविकता तपासली तर डोकं सुन्न होऊन जातं. कित्येक मुलींच्या जीवनात त्यांच्या नकळत्या वयापासून आलेले विचित्र व अत्यंत घृणास्पद अनुभव ऐकल्यावर तर अंगावर काटा उभा राहतो तर पायाची आग सगळ्याच अर्थानं मस्तकात जाते. 


वयाच्या नवव्या दहाव्या वर्षापासून कित्येकींना शाररीक शोषणाचा वा तशा चाळ्यांचा सामना करावा लागतो आणि हे असं कोण करतं तर बाळा बाळा म्हणत, बेटा बेटा म्हणत, तू माझ्या मुलीसारखीच असं म्हणत नको तिथे स्पर्श करून पाहण्याचा प्रयत्न करणारे अगदी जवळचे नातलग, यामधे कधी त्या मुलीच्या अत्यंत जवळचा कुणीतरी असतो. कधी अगदी नात्यातला ज्याच्या खांद्यावर बालपण गेलेलं लांबचा कोणी मामा असतो तर कधी सख्या मावशीचा मुलगा तर कधी शेजारी तर कधी आपल्या वडीलांचा एखादा मित्र. 


एकीकडे वयाच्या तारूण्यसुलभ कुठल्याही भावना अजून ज्यांच्या लेखीही नाहीत अशा मुलींना अशा वाईट अनुभवांचा सामना करावा लागतोय. हे सगळं भयानक आहे. मात्र खरं तर भयानक तर याही पुढं असतं की, आता हे सगळं सांगू कुणाला आणि कसं, विश्वास कोण ठेवणार आपल्यावर या वेगळ्याच विवंचनेत या मुली अटकून जातात. इकडून तिकडून  सांगण्याची हिम्मत करावी म्हटलं तर नातेवाइकांमधे काय चर्चा सरू होइल किंवा आपल्या अशा सांगण्यामुळे कुटुंबाच्या नातेसंबधावर काय परिणाम पडेल या गुंत्यात त्या अडकून जातात. 


असा अनुभव आलेल्या काहीजणी जेव्हा घरी सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा चूप बस काहीही बरळू नकोस, कळतय का तुला तू काय बोलत आहेस. आमचं नाक कापतेस का, त्याने वा त्यांनी उगाच पाठीवरून मायेचा  हात फिरवला असेल तूझ्या असं काहीसं बोलून त्या मुलीची अधिक जास्त कुचंबणा करून टाकतात. मग अशा वेळी जावं तर कुठं जावं आणि स्वत:ची ही विचित्र अवस्था व्यक्त करावी तर कुठं व्यक्त करावी हा असा मोठा सवाल मग या मुलींसमोर येउन उभा राहतो.


सो कॉल्ड खानदानाची अब्रू


हे सगळं भयंकर आहे…अतिजास्त त्रासदायक आहे पण दुर्देव हे की हे समाजातलं सत्य आहे. खरंतर अशा मुलींच्या मागं त्यांच्या कुटुंबांनी ताकतीनं उभं राहीलं पाहीजे. कुठल्याशा नालायक व्यक्तीमुळं आपल्या मुलीचं भवितव्य अंधकारमय होऊ नये याची त्या त्या पालकांनी पहीले काळजी घेतली पाहीजे. डोळाझाक करावा असं प्रकरण नाहीए हे. 


मुलगी जे सांगतेय ते जर खरं असेल तर कुठले फुटकळ नातेसंबंध जपत बसलोय आपण. असं काही कळताच शहानिशा करून जर मुलीचं म्हणणं सत्य असेल तर तो आहे तिथचं जाऊन त्याच्या कानाखाली आवाज काढला पाहीजे. अशा व्हाइट कॉलर वाल्यांचा खरा चेहरा जगापुढे आणलाच पाहीजे. पण असं अनेकदा होत नाही. आपल्या मुलीची बदनामी होइल वा आपल्या सो कॉल्ड खानदानाची अब्रू जाइल या भितीने कित्येकजण आपल्याच मुलीचं तोंड बंद करतात, मात्र याचा परिणाम हा होतो की ती हरामखोर व्यक्ती पुन्हा दुस-या मुलीचा खेळ करण्यासाठी तयार होते.


“पाळी”चा विटाळ मानना-यांना पाळीपाळीनं हाणलं पाहीजे


एकीकडे एकसिव्या जगाची भाषा करणा-या कित्येक आज्या नि अगदी आयाही आपल्या घरात आधूनिक जगाच्या त्या सगळ्या वस्तू-बाबीं आणण्यासाठी आतूर असतात, तिच्या घरात एक लाखाची किचन ट्रॉली बसविण्यात आली. मग ती माझ्याकडे का नको, तिच्याकडे अमुक कंपनींचं मायक्रोव्हेव आहे तर माझ्याकडे कधी येइल वगैरे वगैरे पद्धतीने स्वत:च्या घराला आधूनिक बनवण्याचा प्रय़त्न करणा-या या महिला स्वत:च्या पोरीला आजच्या याच आधूनिक जगात ती जर मेन्स्टूअल सायकल(पाळी)मधे असेल तर तिला त्या आधूनिक किचनचा दरवाजाही ओलांडू देत नाही. किती हे वाइट..किती हा बिनडोकपणा…मात्र हे व असं कितीतरी आज समाजात सर्रास घडतांना दिसतं.


अश्लिलता असण्यात नसून पाहण्यात


आपल्याकडे श्लील-अश्लीलतेवर तोंड सुकेपर्यंत बडबडत राहणं फार सोप्पं असतं, मात्र त्याबाबतीत ठोस पावलं उचलणं फार कठीण आहे. मुळात अश्लिलता दिसण्यात किंवा असण्यात नसते तर ती अधिक करून बघण्यात व कल्पना करण्यातच अधिक असते. डोक्यातच घाण भरलेली असेल तर त्याला कोण काय करणार. स्त्रियांना अगदी घरापासून मिळणारी सापत्नभावाची वागणूक, समाजात मिळणारा दुय्यमदर्जा, धर्माचंही नाकारलेपण या सगळ्याच बाबींचा परिणाम आजच्या स्त्रीला भोगावा लागत असतो.


“समाज” नावाचा प्राणी असतोच कुठे ?


जीवनात विविध निर्णय घेतांनाही आपण समाजाच्या दृष्टीकोनातून निर्णय घेत जात असतो. कधीकधी तर याच समाजाच्या भीतीनं काहीजण स्वत:चं अमुल्य जीवनसुद्धा संपवण्याचा निर्णय घेउन टाकतात. खरतर, कोणत्या समाजाला आपण असे घाबरत असतो. मुळात समाज म्हणावा असा प्रकारजगात अस्तित्वात आहे का..? चला मी समाजाला भेटून येतो असं म्हटल्यावर नेमकं आपण कुणाला भेटायला जावं? 


जसा गर्दी नावाचा शब्द आहे, कळप नावाचा शब्द आहे तसाच समाज नावाचाही एक शब्द आहे हे लक्षात ठेवलं पाहीजे. समाज अशी गोष्ट नसतेच कुठे, असतात ती फक्त सुट्टी सुट्टी माणसं आणि आपण या अशा काही माणसांच्या गर्दीला समाज म्हणायला लागतो. परीक्षेत मुलाला कमी मार्क्स पडले किंवा मुली सोबत काही वाईट घडलं की आता मला समाज काय म्हणेल, असं वाटणा-या बापाला त्याच्या स्टाफमधील चार माणसं किंवा नात्यगोत्यातली पाच माणसं काय म्हणतील याचीच भीती अधिक असते आणि हीच चारपाच माणसं त्याचा समाज असतो. 


जर हे असं असेल तर प्रत्येकाच्या बाबतीत विनाकारणच प्रभाव पाडणारी अशी चार दोन माणसं आपलं इतक्या वर्षांचं जीवन नेस्तनाबूत करायला कारणीभूत ठरावित का ? “समाज काय म्हणेल”, हे वाक्य किमान “जीवन” या शब्दासमोर फार खूजं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहीजे आणि आपल्या कुटुंबापेक्षा समाज मोठा नक्कीच नाही हेही पुन्हा नव्यानं समजून घेतलं पाहीजे.