धनंजय शेळके, प्रोड्यूसर, झी 24 तास, मुंबई : 


तीन महापालिकेतील एकूण जागा -  201


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप – 80


काँग्रेस – 76


राष्ट्रवादी – 21


शिवसेना – 08


बसपा  - 08


मनसे – 02


इतर  - 06


भाजपची घौडदौड सुरूच...      


लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं सुरू केलेली विजयाची घौडदौड याही निवडणुकीत पहायला मिळाली. तीनही महापालिकेत भाजपच्या जागा वाढल्या. तरीही सर्वात लक्षवेधी विजय म्हणाता येईल तो लातूरचा. या ठिकाणी भाजप झिरोचा हिरो झाला आहे. गेल्या निवडणुकीत भाजपकडे या महापालिकेतील एकही जागा नव्हती. या निवडणुकीत थेट शून्यावरुन 36 अशी झेप भाजपनं घेतली आहे.


एक प्रकारे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपनं विजयाची हॅट्ट्रीक केली आहे. नगरपालिका त्यानंतर झेडपीत आणि आता महापालिकेतीही विजय खेचून आणला आहे. इतिहासामध्ये आजपर्यंत लातूर झेडपी आणि महापालिका कधीही भाजपनं जिंकली नव्हती. ती पहिल्यांदाच भाजपनं विजय संपादन करत संपूर्ण जिल्हा भाजपमय केला आहे.


सत्ताधारी काँग्रेसविरुद्धचा रोष, लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली भाजपची विजयी घौडदौड आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्या रुपानं पक्षाला मिळालेलं स्थानिक नेतृत्व यामुळे भाजपचा हा विजय साकार होऊ शकला.


तिकडे चंद्रपुरातही भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तरीही लातूरच्या विजयाच्या तुलनेत तो विजय फिका पडावा असाच आहे. कारण गेल्या निवडणुकीत जरी काँग्रेसला सत्ता मिळाली असली तरी अडीच वर्षांपूर्वी काँग्रेसचा एक गट फूटून निघून भाजपला मिळाला होता. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून शहरात भाजपचा महापौर होता.


जिल्हायत सध्या भाजपकडे दोन तगडे मंत्री आहेत. राज्यात अर्थ खातं सांभाळणारे सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रात महत्वपूर्ण असं गृहराज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणारे हंसराज अहिर यांच्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात निधी आणता आला. त्याचा फायदा पक्षाला निवडणुकीत झालेला दिसतोय.


त्या तुलनेत भाजपला मिळालेलं यश हे मर्यादीतच म्हणावं लागेल. कारण दोन तगडे मंत्री असतानाही भाजपला कसंबसं काठावरचं बहुमत मिळालं आहे. बहुमतासाठी 33 जागा हव्या असताना त्यांना तीन अधिक म्हणजे 36 जागा मिळाल्या आहेत.


परभणीत मात्र पक्षाच्या जागा वाढल्या असल्या तरी अपेक्षीत यश मिळालं नाही. स्थानिक नेतृत्वाचा अभाव, कार्यकर्त्यांची वानवा आणि राज्यपातळीवरील नेत्यांचं दुर्लक्ष यामुळे पक्षाला परभणीत अपेक्षीत यश मिळालं नाही. पक्षाला केवळ 8 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेपेक्षा दोन जागा अधिकच्या जिंकल्या हेच काय ते त्यांना समाधान मानावं लागेल.


काँग्रेसची लातूर, चंद्रपुरात पिछेहाट, मात्र परभणीत सरशी


काँग्रेसला लातूर आणि चंद्रपूरमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला. लातूरचा पराभव काँग्रेसच्या जास्त जिव्हारी लागणार आहे. कारण आजपर्यंत लातूर शहरात काँग्रेस अपराजित राहिली आहे. प्रथमच काँग्रेसला पराभव सहन करावा लागला आहे.


विलासराव देशमुखांच्या पुण्याईवर आजपर्यंत त्यांचे पुत्र अमित देशमुख यांनी लातूरचा बालेकिल्ला शाबूत ठेवला होता. यावेळी मात्र त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. गेल्या पाच वर्षातील महापालिकेचा कारभार त्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप याचं समाधानकारक उत्तर देशमुख यांना देता आलं नाही. त्यातचं त्यांची जनतेपासून तुटलेली नाळ आणि मुक्काम मुंबई यामुळे त्यांच्यावर टीका होत होती. ती नाराजी त्यांना भोवल्याचं दिसून येतंय.


लोकसभा, झेडपी यामध्ये जिल्ह्यात काँगेसची पिछेहाट झाली असली तरी झेडपी निवडणुकीत लातूर तालुक्यात, लातूर शहर आणि लातूर ग्रामिण या भागात विधानसभेत देशमुखांनी खिंड लढवत काही प्रमाणात भाजपची लाट रोखून धरली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीही ते काठावर का होईना पास होतील अशी त्यांना आशा होती. मात्र तीही आता धुळीला मिळाली आहे. त्यामुळे अमित देशमुख यांना लातूर शहरात आणि त्यांचे लहान भाऊ धीरज देशमुख यांना लातूर ग्रामिण विधानसेसाठी आगामी निवडणुकीत कडवं आव्हान उभं राहिलं आहे.  


थोडक्यात गेल्या उन्हाळ्यात लातूरकरांच्या घशाला कोरड पाडणा-या काँग्रेसच्या कारभा-यांना या निवडणुकीत लातूरकरांनी पाणी पाजलं असंच म्हणाव लागेल. चंद्रपुरातही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या निवडणुकीत पक्षाला चंद्रपुरात सत्ता मिळाली होती. मात्र अडीच वर्षांपूर्वी काँग्रेसमधील एक गट भाजपसोबत गेल्यामुळे अडीच वर्षापासूनच काँग्रेसची पिछेहाट सुरू झाली होती. त्यात या निवडणुकीने भर टाकली. पक्षात नरेश पुगलीया आणि विजय वडेट्टीवार यांच्यात असलेली गटबाजी यामुळेही पक्षाला नुकसान सहन करावं लागलं आहे. तरी काँग्रेस हायकमांडने पुगलिया यांच्याकडे शहराची तर वडेट्टीवार यांच्याकडे ग्रामिणची जबाबदारी दिल्यामुळे गटबाजीला थोडाफार पायबंद घातला गेला. तरी वडेट्टीवार प्रचारात फारसे सक्रीय नव्हते. त्याचा फटका काँग्रेसला बसला.


दोन ठिकाणी पराभव स्विकारावा लागलेल्या काँग्रेसला परभणीकरांनी मात्र चांगलाच हात दिला. या ठिकाणी काँग्रेसनं 23 वरुन थेट 31 जागांवर झेप घेतली आहे. बहुमतापासून ते फक्त 2 जागा दूर आहेत. शहरातील राष्ट्रवादीवरील मतदारांचा रोष, शिवसेनेतील खासदार आणि आमदार यांच्यातील गटबाजी, भाजपाचं लुळंपांगळं नेतृत्व आणि सुरेश वरपुडकर यांचं मिळालेलं नेतृत्व यामुळे काँग्रेसला यश मिळू शकलं.


राष्ट्रवादीची जोरदार पिछेहाट


लातूरमध्ये राष्ट्रवादीची फारशी ताकद कधीच नव्हती. गेल्यावेळीही त्यांचे 8 नगरसेवक निवडूण आले होते. यावेळी तर फक्त एक नगरसेवक निवडूण आला आहे. स्थानिक नेतृत्वाचा अभाव, ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातल्या काही नगरसेवाकंनी केलेलं पक्षांतर आणि काँगेस विरोधात असलेला रोष इनकॅश करण्यात आलेलं अपयश यामुळे राष्ट्रवादीला अपयश आलं आहे. तिच परिस्थिती चंद्रपुरात राष्टवादीची आहे. तिथंच स्थानिक नेतृत्वाचा अभाव नसणं हे पराभावामागचं कारण आहे. तिथंही पक्षाला केवळ 2 जागा मिळाल्या.


परभणीतला पराभव मात्र राष्ट्रवादीला जिव्हारी लागणारा आहे. गेल्यावेळी तब्बल 30 जागा जिंकत महापौरपदावर कब्जा करणा-या राष्ट्रवादीला यावेळी केवळ 18 जागा जिंकता आल्या. पालिकेच्या कारभावरची नाराजी आणि सुरेश वरपुडकर यांच्यासोबत पक्षातल्या नेत्यांनी केलेल्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीला अपयश आलं.


शिवसेनेची चौथ्या क्रमांकावर घसरण


या निवडणुकीत सर्वात मोठा पराभव कोणाचा झाला असेल तर तो शिवसनेचा. तीनही ठिकाणी शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. लातूरमध्ये पक्षाला फारशी अपेक्षा नव्हती, मात्र निदान तीन चार जागा तरी जिंकेल असं वाटंत होतं. मात्र तेही शक्य झालं नाही आणि शिवसेनेला लातुरमध्ये भोपळाही फोडता आला नाही.


याआधीही शिवसेनेनेला शहरात फारसं यश आलं नव्हतं. कमकुवत संघटन, कार्यकर्त्यांची वानवा आणि स्थानिक नेतृत्वाचा अभाव यामुळं शिवसेनेला अपयश आलं. चंद्रूपूरमध्ये काही प्रमाणात जागांमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा होती.


आमदार बाळू धानोरकर यांनी निवडणुकीची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी आक्रमकपणे पक्षाचा प्रचार केला. मात्र त्याचं मतांमध्ये रुपांतर करण्यात यश आलं नाही. पक्षाला फक्त दोन जागा मिळाल्या. परभणीतला पराभव मात्र शिवसेनेच्या जिव्हारी लागणार आहे. कारण तिथे पक्षाचा आमदार, खासदार आहे.


पक्षाचं संघटन आहे तरीही पक्ष थेट चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. खासदार आमदारांमधील मतभेद यामुळे पक्षाला अपयश आल्याची चर्चा आहे. स्तानिक नेतृत्वाला आणि पक्षनेतृत्वाला आत्मचिंतन करायला लावणार हा निकाल आहे.