मुंबई : काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारनं दिलेल्या फाईटनंतर शिक्षण वर्तुळात वातावरण टाईट झाले आहे. म्हणजे झालंय असं की डोनेशनमधूम कमवलेला कोट्यवधीचा पैसा आता कुठे सरकवायचा असा प्रश्न संस्थाचालकांना पडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थ्री इडियट्स सिनेमातलं गाणं एरवी विद्यार्थी गायचे. पण यावेळी हे गाणं संस्थाचालक गात आहेत. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फटका शिक्षण संस्थाचालकांना बसला आहे. डोनेशन, देणग्या यातून कमावलेला कोट्यवधी रूपयांचा पैसा आता बँकेत कसा जमा करायचा असा मोठा प्रश्न अनेकांना प़डलाय.


नुकतीच वैद्यकीय, इंजिनिअरींग आणि सर्वच क्षेत्रातली प्रवेश प्रक्रिया पार पडलीय. त्याचा हिशेब पूर्ण होत नाही तोवर 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा सरकारने चलनातून काढून घेतल्या. आता बँकेत जमा करायचे आदेश जारी झालेत. कोचिंग क्लासच्या नावाखालीही जमा होणाऱ्या शुल्काचा हिशेबही द्यावा लागणार आहे. 


या निर्णयामुळे जवळपास सर्वच खासगी संस्थाचालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मोदी सरकारने दिलेला हा झटका अनेकांना पचवता येत नाहीय. आणि त्यामुळेच सध्या काळा पैसा सफेद करण्यासाठी नवनविन पर्याय अवलंबले जातायत. यासाठी शिक्षण संस्था कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत. 


डोनेशनच्या पैशांचे करायचे काय ?


- डोनेशनमधून कोट्यवधींची माया शिक्षण सम्राट कमवतात. हे पैसे आता संस्थेच्या सर्व कर्मचा-यांच्या नावावर बॅंकेत जमा करण्याचे प्रयत्न सुरु झालेत. कॉलेजच्या नावावर जमिनीचा व्यवहार करता येईल का याची चाचपणी होत आहे.


- काळा पैसा देणगीच्या नावावर खपवता येईल का त्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत.


- अनेक खासगी संस्था कर्मचा-यांच्या नावावर लोन काढतात. ते लोन एकत्र देण्याचा पर्यायही अवलंबला जात आहे.



शिक्षणाच्या नावाखाली चालू असलेल्या दुकानदारीला मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे चांगलाच फटका बसला आहे. वेगवेगळ्या मार्गाने हा काळा पैसा पांढरा करण्याचे प्रयत्न सुरु असले तरी भविष्यात कोणत्या संस्थांकडून किती पैसा जमा झाला? एकाच संस्थेच्या सर्व कर्मचा-यांनी पैसा कसा जमा केला ? अशा अनेक प्रश्नांची चौकशी होते का? याची चर्चा सुरु आहे.