मुंबई : वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतीयांना अन्ननलिकेचा कर्करोग आणि अन्य प्रकारच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका आहे. बराच काळ एका ठिकाणी बसून काम करणे आणि मद्यपान या सवयींमुळे हा धोका निर्माण होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

“सध्या भारतात लठ्ठ व्यक्तींची संख्या आणि मद्यपानाची सवयही वाढत आहे. यामुळे कर्करोग आणि आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत आहेत” असे डॉ. एम. जी. भट यांचे म्हणणे आहे. डॉ. भट हे बेंगळुरू येथे लठ्ठपणावरील शस्त्रक्रिया आणि सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी यातील तज्ज्ञ आहेत. भट यांच्या म्हणण्यानुसार लठ्ठपणामुळे अन्ननलिका, स्वादुपिंड, यकृत, मूत्रपिंड, स्तन, गर्भाशय,पित्ताशय, थायरॉईड यांचा कर्करोग होऊ शकतो.


“भारतात लठ्ठपणा एखाद्या महारोगाप्रमाणे पसरत असून सर्वात जास्त लठ्ठपणा पोटाचा दिसून येत आहे” असे डॉ. शशांक शाह यांचे म्हणणे आहे. डॉ. शशांक शाह हे हिंदुजा हेल्थकेअरचे लॅप्रोस्कोपिक आणि बेरियाट्रिक चिकीत्सक आहेत.


मेदयुक्त चरबीपासून ऑस्ट्रोजन बनतो. ऑस्ट्रोजनचे प्रमाण वाढल्यास स्तन आणि गर्भाशयचा कर्करोग होऊ शकतो. लठ्ठ व्यक्तींमधील इन्सुलिनच्या वाढत्या प्रमाणामुळे ट्यूमर होऊ शकतो. अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्च यांच्यातर्फे नुकतेच एक संशोधन करण्यात आले. यानुसार लठ्ठ व्यक्तींमध्ये अन्ननलिकेच्या कर्करोगाचा सामान्य धोका दिसून येतो. तर दारू पिणाऱ्या व्यक्तींमध्ये हा धोका मोठ्या प्रमाणावर असतो.


वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते कर्करोगाचा हा धोका टाळता येऊ शकतो. यासाठी मादक पदार्थांचे सेवन थांबवणे हा उपाय आहे. शिवाय फळे-पालेभाज्या खाणे, चालणे, व्यायाम करणे यामुळेदेखील आरोग्य निरोगी राखता येईल.