मुंबई : मुंबईत उशिरा का होईना दाखल झालेल्या पावसानं मुंबईकरांची घामांच्या धारांतून सुटका केली असली तरी पावसासोबत येणाऱ्या आजारांनी मात्र आता डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आकडेवारींचा आधार घेतला तर मागील वर्षीच्या तुलनेत शहरात साथीच्या आजाराने ग्रस्त रूग्णांची संख्या यंदा कमी आहे. लेप्टोस्पायरसीसचे सहा रूग्ण आढळल्याने बीएमसीचा आरोग्य विभाग अलर्टवर आहे.


पावसाळ्यात विविध आजारांची साथ पसरणं ही काही नवी गोष्ट नसली तरी यंदा उशिरा आलेल्या पावसामुळं मुंबईला या आजारांपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पण आता मान्सून दाखल झाल्यानं साथीचे विविध आजार फैलावू शकतात. मागील वर्षीच्या तुलनेत साथीच्या आजाराचे रूग्ण कमी आढळून आलेत. 


मागील वर्षी १६ जूनपर्यंत तापाचे १०२ रूग्ण आढळले होते. ते यंदा ७९ आढळलेत. तर गँस्टृोचे मागील वर्षी १०२३ रूग्ण होते, ते यंदा ५७९ आहेत. कावीळचे ९९ होते, यंदा ८२ आहेत. मलेरियाचे ६०९ होते,यंदा २८० आहेत. डेंग्यूचे ३८ होते, ते यावर्षी २७ आहेत. लेप्टोस्पायरिससच्या रूग्णांची संख्या मात्र मागील वर्षी ४ होती, ती आता ६ आहे. 


मागील वर्षी लेप्टोनं मुंबईकरांना हैराण केले होते. त्यामुळं आरोग्य विभागानं दक्षता घेत तबेलेधारकांना नोटीसा पाठवल्या आहेत. पावसाळ्यात आजारी पडण्याची शक्यता अधिक असल्यानं पुरेशी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. 


काय घ्यावी काळजी?


- पाणी स्वच्छ आणि उकळून प्यावे. 
- खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. 
- ताजे अन्नपदार्थ खावेत. 
- शिळे आणि बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. 
- बराच वेळ कापून ठेवलेले फळे खावू नका.
- घर आणि परिसरात पाणी साठू देवू नका. 
- अंगावर ताप न काढता डॉक्टरांना दाखवा. 
 


पावसाळ्यात साथीच्या आजारांचा होणारा फैलाव लक्षात घेवून मुंबई महापालिकेच्यावतीने उपाययोजना केल्या जात आहेतच. परंतु नागरिकांनीही विशेष काळजी घेण्याची गरज आहे, हा सल्ला दिला आहे, मुंबई पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी.