नवी दिल्ली : पेट्रोलपंप, वाहतूक सेवा, सरकारी हॉस्पिटलसह विविध महत्त्वाच्या ठिकाणी चलनातून रद्द झालेल्या एक हजार आणि पाचशेच्या नोटा स्वीकारण्यासाठी केंद्र सरकारने दिलेली मुदत मध्यरात्री बारा वाजता संपणार आहे. त्यामुळे मध्यरात्रीनंतर जुन्या पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांना बँका हा एकच पर्याय असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला.. हा निर्णय घेतानाच पेट्रोल पंप, वाहतूक सेवा, सरकारी हॉस्पिटले, स्थानिक स्वराज्य संस्थांचा मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि वीजबिल अशा नागरी सेवांसाठी जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश काढले होते. सुरुवातीला अवघ्या तीन दिवसांसाठी दिलेली मुदत केंद्र सरकारने दोन वेळा वाढवली. 


सुरुवातीच्या गोंधळानंतर आता परिस्थिती बदलल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतोय. त्यामुळे जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. जुन्या नोटांमुळे पालिकांचीही चांदी झाली. महसूलाच्या रुपाने मिळालेल्या पैशांमुळे पालिका मालामाल झाल्या. याशिवाय गुरुवारी मध्यरात्रीपासून वाहनचालकांना टोलनाक्यावर टोल भरुन प्रवास करावा लागणार आहे.