देशात आजपासून धावणार `गतिमान एक्सप्रेस`, जाणून घ्या या खास ७ गोष्टी!
नवी दिल्ली : देशात बुलेट ट्रेनचे वारे वाहत असताना देशातील सर्वात वेगवान रेल्वे आज मंगळवारपासून दिल्ली ते आग्रा दरम्यान धावणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या सुपर फास्ट ट्रेनची खास सात वैशिष्ट्य आहेत.
नवी दिल्ली : देशात बुलेट ट्रेनचे वारे वाहत असताना देशातील सर्वात वेगवान रेल्वे आज मंगळवारपासून दिल्ली ते आग्रा दरम्यान धावणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या सुपर फास्ट ट्रेनची खास सात वैशिष्ट्य आहेत.
१. या ट्रेनचा कमाल वेग १६० किलोमीटर प्रतितास असून दिल्ली ते आग्रा दरम्यानचं अंतर ती केवळ १०० मिनिंटांत कापणार आहे.
२. शुक्रवार सोडून आठवड्याचे इतर सहा दिवस ही ट्रेन धावत राहील.
३. या ट्रेनमध्ये दोन एक्झिक्यूटिव्ह एसी चेअर कार्स डबे असतील तर आठ एसी चेअर कार्स डबे असतील. एसी चेअर कारचे भाडे ७५० रुपये असेल तर एक्झिक्यूटिव्ह चेअर कारचे भाडे १५०० रुपये इतके असेल.
४. विमानातील एअर हॉस्टेसप्रमाणे या ट्रेनमध्ये देशात पहिल्यांदाच रेल हॉस्टेस असणार आहेत. त्या गुलाबाचे फूल देऊन प्रवाशांचे स्वागत करतील आणि इतर सुविधा प्रवाशांपर्यंत पोहोचवतील.
५. मल्टिमीडिया मनोरंजनची खास सोय या ट्रेनच्या डब्यांमध्ये असणार आहे. या ट्रेनच्या डब्यांमध्ये लावलेल्या हॉटस्पॉट उपकरणांमुळे प्रवाशांना त्यांच्या मोबाईल, टॅबलेट्स किंवा लॅपटॉपवर इंटरनेटचा निशुल्क लाभ घेता येईल.
६. खानपानासाठी या ट्रेनमध्ये उपमा, मिनी डोसा, कांजीवरम इडली, ताजी फळे, आलू कुलचा, स्विस रोल, चिकन रोल आणि भाजलेला सुका मेवा असे पदार्थ दिले जातील.
७. दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकातून हि ट्रेन सकाळी ८:१० ला निघून ९:५० ला आग्र्याला पोहोचेल. तर सायंकाळी ५:५० ला ही ट्रेन परतीच्या प्रवासासाठी आग्रा सोडेल आणि संध्याकाळी ७:३० ला हजरत निजामुद्दीन येथे दाखल होईल.