चेन्नई : उल्का पडण्यासारखे चमत्कार आकाशात बघायला फार मजा येते. तुटता तारा पाहून इच्छा मागणारे देखील अनेक जण आहेत. पण, याच उल्कापातामुळे कोणाचे तरी आयुष्य उध्वस्त होऊ शकते यावर विश्वासही बसणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये मात्र एका व्यक्तीचा मृत्यू चक्क उल्कापातामुळे झाल्याची घटना घडलीये. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललीता यांनीच यासंबंधीची माहिती दिली आहे.


वेल्लोरमधील एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात शनिवारी रात्री एक उल्का कोसळली. उल्का कोसळताच परिसरात प्रचंड आवाज झाला. यामुळे इमारतीच्या अनेक काचाही फुटल्या. तिथेच काम करणाऱ्या कामराज नावाच्या व्यक्तीचा यामुळे मृत्यू झाला. या उल्कापातात अजून तीन जण जखमी झाले आहेत.


उल्कापातामुळे मृत्यू होणं ही तशी एक खूप दुर्मिळ घटना आहे. या उल्कापातामुळे महाविद्यालयाच्या परिसरात एक खड्डाही तयार झाला आहे. राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी या ठिकाणी जाऊन हा उल्कापात असल्याची खात्री केली आहे.