नवी दिल्ली :  येत्या महिला दिनाच्या निमित्त सरकारी हवाई वाहतूक कंपनी असलेली एअर इंडिया एक इतिहास रचणार आहे. भारतातील नवी दिल्ली ते अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को या जगातील सर्वात लांबच्या मार्गावर महिलांसाठी विमान सफर आयोजित कऱण्यात आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विमानात १४ क्रू मेंबर्स असतील तर चार पायलट असतील, विशेष म्हणजे या सर्व महिला असतील. ६ मार्च रोजी या विमानाचे उड्डाण होईल आणि ८ मार्चला हे विमान भारतात परत येईल. याचसोबत महिला दिनाच्या निमित्ताने देशभरातही काही मार्गांवर महिलांसाठी विमान सफरींचे आयोजन करण्यात आले आहे.  


१९८५ मध्ये जगात पहिल्यांदा महिला पायलटद्वारे विमान चालवण्यात आले होते. 'महिला दिनाच्या निमित्त केली जाणारीही विमान सफर म्हणजे महिला सशक्तीकरणाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असेल. तसेच ही ऐतिहासिक आणि संपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांतर्फे चालवली जाणारी सर्वाधिक अंतराची सफर असेल,' अशी प्रतिक्रिया एअर इंडियाच्या मुख्य अधिकारी अश्वनी लोहानी यांनी व्यक्त केली आहे. 



या विमानाच्या इंजिनिअर, तसेच उड्डाणाच्या वेळी बोर्डिंग पास देण्यासाठी आणि तपासण्यासाठी एअरपोर्ट गेटवरही महिलाच असतील.एअर इंडियाच्या एकूण २७,५०० कर्मचाऱ्यांपैकी ३,८०० महिला आहेत. दरवर्षी महिला दिनाला एअर इंडियातर्फे अशा प्रकारच्या विमानाचे उड्डाण करविले जाते.