लखनऊ : काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाशी महाआघाडीच्या चर्चांना ब्रेक लागलेला असातना अखिलेश यादवांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

191 जणांच्या या यादीत अखिलेशचे कट्टर विरोधक आणि वादाचं मूळ ठरलेले शिवपाल यादव यांचाही समावेश करण्यात आलाय. तर सपा सोडून भाजपमध्ये गेलेल्या बेनीप्रसाद वर्मांच्या जागी अरविंदसिंह गोप यांना तिकीट देण्यात आलंय.


सपाचे खासदार नरेश अगरवाल यांचे चिरंजीव नितीन अगरवाल यांची पहिल्या यादीत हरदोयी मतदारसंघात वर्णी लागलीय. तिकडे सपाचे ज्येष्ठ मंत्री आझम खान यांचे पुत्र अब्दुल्ला आझम खान यांनाही रामपूरमधून तिकीट देण्यात आलंय.


दरम्यान, काँग्रेस आणि समाजवादी पार्टीकडून दुर्लक्षित राहिलेल्या राष्ट्रीय लोकदलानं उत्तर प्रदेशात सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय. अन्य 10 छोट्या पक्षांच्या मदतीनं पूर्ण ताकदीनं अजित सिंग यांचा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. या पक्षाची उत्तर प्रदेशात इतकी मोठी ताकद नसली, तरी समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची मतं खाऊन त्याचा भाजपाला अप्रत्यक्ष फायदा मिळू शकतो, असं मानलं जातंय.